सैफच्या घटस्फोटानंतर शर्मिला यांचं पूर्व सुनेशी कसं आहे नातं? साराने सांगितलं सत्य
सैफ अली खानने ऑक्टोबर 1991 मध्ये अमृताशी लग्न केलं होतं. 2004 मध्ये हे दोघं विभक्त झाले. तेव्हापासून सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन्ही मुलं अमृतासोबतच राहतात. त्यानंतर ऑक्टोबर 2012 मध्ये सैफने करीना कपूरशी लग्न केलं.
अभिनेता सैफ अली खानला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री अमृता सिंगनेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला. सैफ आणि अमृताची मुलगी सारा अली खान ही विविध मुलाखतींमध्ये अनेकदा आजी शर्मिला टागोरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आता दिल्लीतील एका कार्यक्रमात साराने सांगितलं की आईवडिलांच्या घटस्फोटाला वीस वर्षे ओलांडल्यानंतरही आजी आजसुद्धा प्रत्येक गोष्टीत तिची साथ देते. त्याचप्रमाणे अमृतासोबतही शर्मिला यांचं खास नातं असल्याचं सारा म्हणाली. “घटस्फोटामुळे माझे आईवडील जरी एकत्र राहत नसले तरी आजीचं आईसोबत खूप चांगलं नातं आहे. माझ्या आईला पालक नाहीत. पण उद्या जर मला किंवा इब्राहिमला काही झालं तर माझी आई एकटी पडणार नाही याची मला खात्री आहे. कारण बडी अम्मा तिच्यासोबत असेल आणि ती सर्वकाही सांभाळू शकेल”, अशा शब्दांत सारा व्यक्त झाली.
आजीसोबतच्या नात्याविषयी सारा पुढे म्हणाली, “माझ्या आयुष्यातील एक काळ असा होता, जेव्हा मला पाठिंब्याची गरज होती. त्यावेळी बडी अम्मा माझ्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली. अशा परिस्थितीत तुम्हाला नात्याचं खरं महत्त्व समजून येतं.” शर्मिला यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 8’ या चॅट शोमध्ये मुलगा सैफ अली खानसोबत हजेरी लावली होती. या शोमध्ये त्या सैफ आणि अमृताच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या.
View this post on Instagram
“हा फक्त एकमेकांपासून वेगळं राहण्याबद्दलचा प्रश्न नव्हता. त्यात इतरही बऱ्याच गोष्टी समाविष्ट होत्या. ती वेळ आमच्यासाठी अजिबात चांगली नव्हती. कारण त्यावेळी इब्राहिम फक्त तीन वर्षांचा होता आणि आम्हाला लहान मुलांची खूप आवड होती. खासकरून टायगर आणि इब्राहिमची फार जवळीक होती. त्यामुळे त्यांनाही इब्राहिमसोबत पुरेसा वेळ मिळाला नाही. अमृता आणि तिच्यासोबत दोन्ही मुलांची साथ गमावणं, आमच्यासाठी दुपटीने त्रासदायक होतं,” असं त्या म्हणाल्या होत्या.
अमृतासोबतच्या घटस्फोटाविषयी शर्मिला पुढे म्हणाल्या, “जेव्हा तुम्ही इतकी वर्षे एकत्र राहता आणि तुम्हाला इतकी गोंडस मुलं असतात, तेव्हा कोणतंच ब्रेकअप सोपं नसतं. त्यामुळे सुसंवादाने सगळं झालं होतं, अशी गोष्ट नाही. त्या टप्प्यावर सुसंवाद साधणं किती कठीण असतं हे मला माहीत आहे. प्रत्येकजण दुखावला गेला होता. त्यामुळे आयुष्यातील तो टप्पा चांगला नव्हता. पण मी माझे प्रयत्न केले. अमृताला शांत होण्याची गरज होती.”