मुंबई : अभिनेते, दिग्दर्शिक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. सतीश यांचे मित्र विकास मालू यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले. विकास मालू यांनी 15 कोटी रुपयांसाठी कौशिक यांचा जीव घेतला, असा धक्कादायक दावा तिने केला. याप्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत आहेत. दुसरीकडे कौशिक यांचे कुटुंबीय अद्याप त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरले नाहीत. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या 10 वर्षीय मुलीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला होता. मात्र आता अचानक वंशिकाने तिचं अकाऊंट डिलिट केलं आहे.
9 मार्च रोजी सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं. त्यानंतर वंशिकाने वडिलांसोबतचा फोटो इन्स्टाग्रावर पोस्ट केला होता. आता तिने तिचं अकाऊंटच डिलिट केलं आहे. सतीश कौशिकसुद्धा नेहमीच सोशल मीडियावर मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायचे आणि त्यात तिला टॅग करायचे. ते वंशिकाच्या ज्या अकाऊंटला इन्स्टाग्रामवर टॅग करायचे, तो अकाऊंट आता उपलब्ध नाही.
आपलं अकाऊंट डिलिट करण्याआधी वंशिकाने तिच्या शेवटच्या पोस्टमध्ये वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये ती तिच्या वडिलांना मिठी मारून हसताना दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने फक्त हृदयाचा इमोजी पोस्ट केला होता. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत कौशिक यांचा पुतणा निशांतने आता शशी आणि वंशिका कसे आहेत, याविषयी सांगितलं होतं. “त्या दोघी या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हे करणं त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. शशी काकी शांत होऊन जातात आणि आठवणींमध्ये हरवून जातात. वंशिका पाहुण्यांसमोर काहीच बोलत नाही. मात्र जेव्हा ती एकटीच असते, तेव्हा एका कोपऱ्यात निराश होऊन बसते”, असं त्यांनी सांगितलं होतं.
सतीश कौशिक यांचं बुधवारी दिल्लीत हार्ट अटॅकने निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. सतीश कौशिक बुधवारी मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीला गेले होते. रात्री छातीत दुखू लागल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराआधी त्यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. तरीही मृत्यूचे निश्चित कारण न समजल्याने त्यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं होतं. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार्टर विमानाने पार्थिव मुंबईत आणण्यात आलं.
अनुपम खेर, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, जॉनी लिव्हर, जावेद अख्तर, बोनी कपूर, पंकज त्रिपाठी यांसारख्या कलाकारांनी आपल्या लाडक्या सहकलाकाराला अंतिम निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती.
मूळचे हरयाणाचे असलेल्या सतीश कौशिक यांनी दिल्लीत कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि FTII मधून प्रशिक्षण पूर्ण केलं. कामासाठी मुंबईची वाट पकडलेल्या सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरही काम केलं.