मुंबई : वयाच्या 66 व्या वर्षी बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याविषयीची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच 7 मार्च रोजी सतीश कौशिक यांनी चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि काही फोटोसुद्धा पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये ते इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत होळी खेळताना दिसत आहेत. सतीश कौशिक यांनी पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री महिमा चौधरी, अभिनेता अली फजल आणि त्याची पत्नी रिचा चड्ढा दिसत आहेत.
जुहूमधील जानकी कुटीरमध्ये इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांसोबत होळी साजरी केल्याची माहिती त्यांनी या पोस्टद्वारे दिली होती. सोशल मीडियाद्वारे त्यांनी सर्वांना शुभेच्छासुद्धा दिल्या होत्या. या फोटोंमध्ये त्यांचा हसता चेहरा पाहून चाहते भावूक होत आहेत. कारण हीच त्यांची सोशल मीडियावरील अखेरची पोस्ट ठरली. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला.
Colourful Happy Fun #Holi party at Janki Kutir Juhu by @Javedakhtarjadu @babaazmi @AzmiShabana @tanviazmi.. met the newly wed beautiful couple @alifazal9 @RichaChadha.. wishing Happy Holi to everyone ??????? #friendship #festival #Holi2023 #colors pic.twitter.com/pa6MqUKdku
— satish kaushik (@satishkaushik2) March 7, 2023
मृत्यू हेच या जगाचं अंतिम सत्य आहे, हे मला माहीत आहे. पण माझ्या हयातीत माझा अत्यंत जवळचा मित्र सतीश कौशिकबाबत मी ही गोष्ट लिहीन याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. आमच्या 45 वर्षांच्या मैत्रीला अचानक असा पूर्णविराम लागला आहे. आता सतीशशिवाय आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं राहणार नाही, असं त्यांनी लिहिलं आहे.
13 एप्रिल 1956 रोजी हरयाणाच्या महेंद्रगढ याठिकाणी सतीश कौशिक यांचा जन्म झाला. त्यांनी 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मासूम’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. सतीश कौशिक यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केलंय. 1993 मध्ये ‘रुप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यानंतर बरेच चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात साकारलेल्या ‘कॅलेंडर’ या भूमिकेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली.