मुंबई : अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 7 मार्च रोजी त्यांनी जुहूमध्ये इंडस्ट्रीतल्या सहकलाकारांसोबत होळी साजरी केली. मात्र दोन दिवसांनंतर 9 मार्च रोजी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. गुरुवारी रात्री वर्सोवा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कौशिक यांच्या निधनावर सोशल मीडियावर शोक व्यक्त होत आहे. अशातच त्यांच्या मॅनेजरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. कौशिक यांना हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा त त्यांच्यासोबतच होते. 9 मार्च रोजी रात्री 12 वाजता नेमकं काय घडलं, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सतीश कौशिक यांच्या मॅनेजरला माध्यमांकडून प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर ते म्हणतात, “9 मार्च रोजी रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी सतीश कौशिक यांनी अस्वस्थपणा जाणवल्याचं सांगितलं. श्वास घेताना त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी लगेचच त्यांना फोर्टिज रुग्णालयात घेऊन गेलो. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आलं.”
“रात्री 12.10 च्या सुमारास ते झोपले होते. झोपतानाच त्यांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं,” असंही त्यांनी पुढे सांगितलं. सतीश कौशिक बुधवारी मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीला गेले होते. रात्री छातीत दुखू लागल्याने त्यांना फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराआधी त्यांचं निधन झालं. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार्टर विमानाने पार्थिव मुंबईत आणण्यात आलं.
अनुपम खेर, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, जॉनी लिव्हर, जावेद अख्तर, बोनी कपूर, पंकज त्रिपाठी यांसारख्या कलाकारांनी आपल्या लाडक्या सहकलाकाराला अंतिम निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती.
मूळचे हरयाणाचे असलेल्या सतीश कौशिक यांनी दिल्लीत कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि FTII मधून प्रशिक्षण पूर्ण केलं. कामासाठी मुंबईची वाट पकडलेल्या सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरही काम केलं.
माझ्याकडे कामांची लांबलचक यादी आहे आणि मी ते पूर्ण करणार, असं त्यांनी ‘थर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान बोलून दाखवलं होतं. सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात त्यांनी अखेरची भूमिका असल्याचं सांगितलं जातंय. त्याचसोबत कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.