मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर हिट ठरतेय. ‘भुलभुलैय्या 2’नंतर या दोघांनी आता ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात एकत्र काम केलं. हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. 29 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत दमदार कमाई केली आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याचा फायदा या चित्रपटाला मिळाल्याचं दिसतंय. त्याचप्रमाणे रविवारीसुद्धा कमाईत खूप चांगली वाढ पहायला मिळाली. ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसने केलं आहे. समीरने याआधी आनंदी गोपाळ, डबलसीट, धुरळा, वायझेड, क्लासमेट्स, लग्न पहावे करून यांसारख्या दमदार मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. आता बॉलिवूडमध्येही त्याच्या चित्रपटाला चांगलं यश मिळत आहे.
कोणत्याही चित्रपटासाठी पहिला वीकेंड खूप महत्त्वाचा असतो. ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाने पहिल्या वीकेंडची परीक्षा चांगल्या गुणांनी पास केली असं म्हणायला हरकत नाही. कारण रविवारी या चित्रपटाने तब्बल 12 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाची कमाई जवळपास 38 कोटी रुपये इतकी झाली आहे. साजिद नाडियादवाला आणि नम: पिक्चर्स निर्मित हा चित्रपट गेल्या गुरुवारी देशभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 9.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात कार्तिक आणि कियारासोबतच गजराज राव, सुप्रिया पाठक, राजपाल यादव, सिद्धार्थ रांधेरिया, अनुराधा पटेल, निर्मिती सावंत आणि शिखा तलसानिया यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात कार्तिकने सत्यप्रेम तर कियाराने कथा ही भूमिका साकारली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कार्तिकने मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यांचे आभार मानले.
पहिला दिवस- 9.25 कोटी रुपये
दुसरा दिवस- 7 कोटी रुपये
तिसरा दिवस- 10.10 कोटी रुपये
चौथा दिवस- 12 कोटी रुपये
एकूण- 38 कोटी रुपये
हा चित्रपट प्रदर्शित होताच ‘आदिपुरुष’ आणि ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवरील खेळ जवळपास खल्लास झाला आहे. तगड्या बजेटचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट फक्त सुरुवातीच्या दिवसांत गाजला. मात्र प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांनंतर त्याची कमाई ढासळू लागली. आता नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या कमाईला मोठा फटका बसला आहे.