Ketaki Chitale: “जर तू माझ्यासमोर असतीस ना, तर मी..”, शरद पवारांवरील पोस्टवरून सविता मालपेकर भडकल्या
"कोण आहे ही केतकी, काय लायकी आहे तिची? तिचं कर्तृत्व काय आहे? एखाद-दुसऱ्या सीरिअलमध्ये काम केलंय. ज्या सीरिअलमध्ये तिला स्वत:चं कामसुद्धा टिकवतं आलं नाही, त्या मुलीने असं काहीतरी बोलावं," अशा शब्दांत अभिनेत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या सरचिटणीस सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनी राग व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला रविवारी ठाणे न्यायालयाने 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुंबईतही तिच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले. केतकीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. तिच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टीकेची झोड सुरू केली. त्यानंतर आता कलाविश्वातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “कोण आहे ही केतकी, काय लायकी आहे तिची? तिचं कर्तृत्व काय आहे? एखाद-दुसऱ्या सीरिअलमध्ये काम केलंय. ज्या सीरिअलमध्ये तिला स्वत:चं कामसुद्धा टिकवतं आलं नाही, त्या मुलीने असं काहीतरी बोलावं,” अशा शब्दांत अभिनेत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या सरचिटणीस सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनी राग व्यक्त केला.
काय म्हणाल्या सविता मालपेकर?
“ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर माझा संताप झालाय. माझ्या बोलण्यातून तुम्हाला कळत असेल की माझा किती संताप झालाय. कोण आहे ही केतकी, काय लायकी आहे तिची? तिचं कर्तृत्व काय आहे? एखाद-दुसऱ्या सीरिअलमध्ये काम केलंय. ज्या सीरिअलमध्ये तिला स्वत:चं कामसुद्धा टिकवतं आलं नाही, त्या मुलीने असं काहीतरी बोलावं. हे बघ केतकी, हे जे तू बोलली आहे, तू जे लिहिलं आहेस.. हे तू केलंच आहेस पण तुझा खरा बोलविता धनी कुणीतरी दुसरा आहे. त्याचा तर शोध आम्ही घेणारच. पण सगळ्यात आधी तुझा समाचार घेणार आहे. अगं कुठल्या माणसाविषयी बोलतेयस? हिमालयएवढं कर्तृत्व असलेल्या माणसाविषयी बोलतेयस तू. अगं तू तर क्षुद्र आहेस, तुझी लायकी पण नाहीये. त्यांचं नाव घेण्याचीही तुझी लायकी नाहीये आणि तू त्या माणसाविषयी बोलतेयस. लक्षात ठेव केतकी, पवारसाहेब हे आम्हा सर्वांच्या वडिलधाऱ्याप्रमाणे आहेत. राष्ट्रवादी हे एक कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबप्रमुखाबद्दल बोललेलं आम्ही सहन करणार नाही. तुझा समाचार तर आम्ही सगळेच जण घेणार आहोत पण आता जर तू माझ्यासमोर असतीस ना, तर मी तुझं काय केलं असतं हे सांगता येत नाही. ऐकून तर तुला माहितीच असेल की मी काय करू शकते. एक कलाकार म्हणून मी बोलतेय आणि राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाची सरचिटणीस म्हणून मी तुला इशारा देते, यापुढे तू जर असं काही बोललीस आणि जे बोललीस ते शब्द मागे घेतले नाहीत, पवार साहेबांची माफी मागितली नाहीस तर जिथेकुठे तू असशील तिथून तुला शोधून काढून पवारसाहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही तर नावाची सविता मालपेकर नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. तुझ्यावर अन्याय झाला होता तेव्हा मी जसं तुला पाठिशी घातलं होतं तसंच तुला मी शिक्षाही करू शकते. माझी चांगली बाजू जशी तू बघितलीस तशी माझी वाईट बाजूही तुला कळेल,” असं त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी शनिवारी केतकीविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकने तिला शनिवारी नवी मुंबईतील कळंबोली इथून अटक केली होती. रविवारी सकाळी तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.