Scam 2003 The Telgi Story च्या ट्रेलरमध्ये मराठी कलाकारांचा बोलबाला; सर्वांत मोठ्या घोटाळ्याची कहाणी
अब्दुल करीम तेलगीने कशा पद्धतीने खोटेपणा आणि फसवणुकीच्या जोरावर त्याचं साम्राज्य निर्माण केलं, याची झलक पहायला मिळते. 'अगर देश की अर्थव्यवस्था कुबेर का खजाना है, तो स्टॅम्प पेपर उसकी चाबी है' हा तेलगीच्या तोंडातील संवाद त्याच्या फसवणुकीच्या फंड्याला उघड करतो.
मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : दिग्दर्शक हंसल मेहता हे ‘स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी’ ही नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. ‘स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी’ या सीरिजनंतर प्रेक्षकांची प्रचंड उत्सुकता वाढली आहे. आता या नव्या स्कॅमच्या कथेचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरमध्ये मुख्य भूमिकेसोबतच बऱ्याच मराठी कलाकारांची वर्णी लागल्याचं पहायला मिळत आहे. शशांक केतकर, निखिल रत्नपारखी, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि भरत जाधव यांसारखे कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत.
या ट्रेलरच्या सुरुवातीलाच तेलगीची ओळख ऐकायला मिळते. खोटा सिक्का, साप अशी विविध नावं त्याला देण्यात आली आहेत. थिएटर आर्टिस्ट गगन देव रियार हा या सीरिजमध्ये अब्दुल करीम तेलगीच्या भूमिकेत आहे. तेलगीने तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा स्टँप पेपर घोटाळा केला होता.
पहा ट्रेलर
अब्दुल करीम तेलगीने कशा पद्धतीने खोटेपणा आणि फसवणुकीच्या जोरावर त्याचं साम्राज्य निर्माण केलं, याची झलक पहायला मिळते. ‘अगर देश की अर्थव्यवस्था कुबेर का खजाना है, तो स्टॅम्प पेपर उसकी चाबी है’ हा तेलगीच्या तोंडातील संवाद त्याच्या फसवणुकीच्या फंड्याला उघड करतो.
कर्नाटकातील खानापूर इथं जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगीचा फळविक्रेत्यापासून ते सर्वांत मोठ्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड बनण्यापर्यंतचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. तेलगी स्टँप घोटाळ्याने संपूर्ण देश हादरलं होतं. तेलगीने देशातील 12 राज्यांमध्ये 176 कार्यालयांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचं बनावट स्टँप विक्रीचं साम्राज्य राजरोस उभं केलं होतं.
तेलगी घोटाळा-
अब्दुल करीम तेलगी आणि त्याच्या भावांनी नाशिकच्या प्रींटिंग प्रेसमधून जुनी मशिनरी आणून बनावट मुद्रांक छापले होते. हे बनावट स्टँप देशभरात विकून त्याने कोट्यवधी रुपये जमवल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यातील आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2003 मध्ये तेलगीला अटक करण्यात आली होती. 20 हजार कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यात तेलगीला 2007 मध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला 30 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इतकंच नाही तर त्याच्यावर 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. 2017 मध्ये त्याचा बेंगळुरुतील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.