15 फिल्म, 20 मालिकांमध्ये दमदार काम, कॅन्सरनं गाठलं, आर्थिक विवंचना, घरातलं सामान विकण्याची हिरोईनवर वेळ
शगुफ्ताचं म्हणणंय की गेल्या चार वर्षात त्यांच्या समस्या वाढल्यात. सहा वर्षापुर्वी त्यांना मधूमेह असल्याचं कळालं आणि तेव्हापासूनच इतर आजारही सुरु झाले.
बॉलीवूड आणि टीव्ही अभिनेत्री शगुफ्ता अलींची (Shagufta ali) खरोखरच खडतर वेळ सुरु आहे. गेल्या 36 वर्षांपासून त्या लोकांचं मनोरंजन करतायत. त्यात त्यांनी 15 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलंय तर 20 पेक्षा जास्त लोकप्रिय मालिकांमध्ये त्या दर्जेदार भूमिका वठवत आल्यात. आता मात्र त्या एकीकडे आजारपण आणि त्यात पुन्हा आर्थिक तंगी अशा दोन्हीच्या कचाट्यात सापडल्यात.
शगुफ्ता अली स्वत:च्या स्थितीबद्दल बोलताना म्हणाल्या- ‘मी गेल्या 20 वर्षांपासून आजारी आहे पण त्यावेळेस माझं वय कमी होतं आणि मी आजारपणाचा सामना करु शकत होते. खरं तर मला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर (Breast cancer survivor)होता पण मी त्यात तगले. ही माझी पहिलीच वेळ आहे जेव्हा मी माझ्या आजारपणाबद्दल
बोलते आहे. तसेही इंडस्ट्रीत माझे कमीच मित्र आहेत. मीडियालाही माझ्या आजारपणाबद्दल
काही माहित नव्हतं. कुणालाच माहिती नव्हतं मी किती कठिण काळातून जातेय. ज्यावेळेस मला कॅन्सर झाल्याचं
कळालं तेही तिसऱ्या स्टेजवर असल्याचा त्यावेळेस माझ्या हातात भरपूर काम होतं’.
कॅन्सरशी दोन हात शगुफ्ता पुढं म्हणाल्या की,- मला ती गाठ हटवण्यासाठी मोठी सर्जरी करावी लागली. त्यासाठी मी किमोथेरपी केली. ती करणं म्हणजे प्रत्येक वेळेस एक नवा जन्म घेण्यासारखं होतं. पण मी हार नाही मानली. त्याही अवस्थेत मी छातीला कुशन लावून सतराव्या दिवशी दुबईला शुटींगला गेले होते. पण संकटं वाढत होते. त्याच शुटींगच्या काळात माझे काही अपघात झाले. ज्यात मला काही जखमा झाल्या. त्यात पुन्हा मी माझ्या वडीलांना बघण्यासाठी जात असतानाच एक मोठा अपघात झाला. परिणामी, माझा हाडाचे दोन तुकडे झाले. त्यांना जोडण्यासाठी स्टीलचा रॉड टाकावा लागला. पण मी माझं काम नाही सोडलं.
डायबिटीजनं आजारपण वाढलं शगुफ्ताचं म्हणणंय की गेल्या चार वर्षात त्यांच्या समस्या वाढल्यात. सहा वर्षापुर्वी त्यांना मधूमेह असल्याचं कळालं आणि तेव्हापासूनच इतर आजारही सुरु झाले. म्हणजे ज्या व्याधी तुम्हाला पासष्टीनंतर व्हायला लागतात त्या त्यांना कमी वयातच सुरु झाल्या. डायबिटीजमुळे त्यांच्या पायात खुप दुखतं. स्ट्रेसमुळे त्यांच्या साखरेची लेवल वाढते. ह्या सगळ्यांचा परिणाम शगुफ्ता अलींच्या डोळ्यावरही होतोय आणि त्यासाठी त्यांना उपचाराची गरज आहे.
मदत हवी पण सोबत कामही हवं फक्त 17 वर्षाच्या होत्या तेव्हा शगुफ्ता अलींनी कामाला सुरुवात केली. आता त्या 54 वर्षांच्या आहेत. सध्या काम नसल्यामुळे घरातल्या वस्तू विकायची त्यांच्यावर वेळ आलीय. शगुफ्ता अलींना त्यांच्यावरच्या उपचारासाठी पैसे तर हवेतच पण त्यांच्या आईच्या उपचारासाठीही हवेत. त्यासाठी त्या कामही करु इच्छितात. आतापर्यंत सुमीत राघवन(Sumit raghavan), नीना गुप्ता (Neena gupta) आणि सुशांत सिंह (Sushant Singh) त्यांच्या मदतीसाठी पुढं आलेत.