मुंबई: शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईची त्सुनामी आणली आहे. फक्त चित्रपट समीक्षकांकडूनच नाही तर प्रेक्षकांकडूनही ‘पठाण’ला चांगला प्रतिसाद मिळतोय. पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या ‘पठाण’मुळे बॉलिवूडला नवसंजीवनी मिळाल्याचं म्हटलं जातंय. देशभरात 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त तर जगभरात 100 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाला IMDb वर मात्र कमी रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
‘पठाण’ची IMDb रेटिंग पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. चित्रपट समीक्षकांनी ‘पठाण’ला चार आणि त्यापेक्षा अधिक स्टार्स दिले आहेत. मात्र या चित्रपटाला 7.1 IMDb रेटिंग मिळाली आहे. 30,832 युजर्सनी ही रेटिंग दिली आहे. 48.1 टक्के युजर्सनी 10 रेटिंग दिली आहे. तर 7 टक्के युजर्सनी 9 रेटिंग दिली आहे. 8.1 टक्के लोकांनी 8 आणि 29.2 टक्के लोकांनी 1 रेटिंग दिली आहे.
IMDb ची ही रेटिंग शाहरुख खानच्या चाहत्यांच्या पचनी पडत नाहीये. एकीकडे ‘पठाण’ची जोरदार कमाई सुरू असताना IMDb रेटिंगमध्ये इतकी घसरण का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. या प्लॅटफॉर्मवर स्टार्स पद्धतीने रेटिंग दिलं जातं. 10 हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना इथं रेटिंग देता येतं. आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते.
पठाण या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत. शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे.