मुंबई: बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खान तब्बल चार वर्षांनंतर ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आपल्या लाडक्या सेलिब्रिटीसाठी चाहते नेहमीच काही ना काही करण्याचा प्रयत्न करतात. अशातच शाहरुखच्या एका फॅन क्लबने ‘पठाण’च्या फर्स्ट डे फर्स्ट शोची सर्व तिकिटं बुक केली आहेत. मुंबईतल्या गेट्टी गॅलेक्सी थिएटरमधील सकाळी 9 वाजताची सर्व तिकिटं बुक करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे या थिएटरमध्ये कोणत्याही चित्रपटाचा पहिला शो हा दुपारी 12 वाजता असतो. मात्र शाहरुखच्या चित्रपटासाठी थिएटर मालकाने त्यांची पॉलिसी बदलली आहे. G7 मल्टिप्लेक्स आणि मराठी मंदिर सिनेमाचे कार्यकारी संचालक मनोज देसाई याविषयी म्हणाले, “होय, हे खरं आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी संपूर्ण थिएटर बुक केला आहे.”
2018 मध्ये शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांनी भूमिका साकारल्या होत्या. मात्र बॉक्स ऑफिसवर त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. या चित्रपटानंतर शाहरुखने खूप मोठा ब्रेक घेतला. मध्यंतरीच्या काळात तो रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकला होता. मात्र यात त्याची भूमिका खूप लहान होती.
पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदीसोबतच हा चित्रपट तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भूमिका आहेत. पठाणची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा जोरदार झाली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाची कमाई किती होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
“मी 32 वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीत एक ॲक्शन हिरो बनण्यासाठी आलो होतो. मात्र ते मी बनू शकलो नाही. कारण त्यांनी मला एक रोमँटिक हिरो बनवून टाकलं. मला फक्त ॲक्शन हिरो बनायचं होतं. मी डीडीएलजेवरही (दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे) प्रेम करतो. मला राहुल, राज आणि ती सर्व चांगली मुलं आवडतात. पण मला नेहमीच असं वाटायचं की मी एक ॲक्शन हिरो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे माझं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे”, असं शाहरुख म्हणाला.