मुंबई- गेल्या काही काळात जिममध्ये वर्कआऊट करत असताना सेलिब्रिटींना कार्डिॲक अरेस्ट किंवा हृदयविकाराचा झटका आल्याची बरीच वृत्तं समोर आली. या वृत्तांमुळे केवळ सर्वसामान्य आणि सेलिब्रिटींमध्ये वर्कआऊटची भिती बसली नाही, तर हेल्थ फिटनेस बिझनेसवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर प्रशांत सावंतने याविषयी मोलाचा सल्ला दिला आहे. प्रशांत गेल्या 25 वर्षांपासून फिटनेस इंडस्ट्रीत कार्यरत आहे. सध्या तो शाहरुख खान आणि वरुण धवनला फिटनेस ट्रेनिंग देतोय.
“वर्कआऊटदरम्यान होणाऱ्या हार्ट अटॅकच्या वृत्तांमुळे फिटनेसच्या बाबतीत लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कोविडनंतर लोकांच्या शरीरात आणि इम्युनिटीमध्ये बरेच बदल झाले आहेत. मी दररोज लोकांना भेटतो. हे बदल काय आहेत, याची कल्पना त्यांना अद्याप नाही”, असं प्रशांत एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
“वर्कआऊटदरम्यान हार्ट अटॅकच्या बातम्या पाहिल्यानंतर भीती निर्माण होणं साहजिक आहे. परंतु मी म्हणेन की व्यायाम करणं हे नेहमीच आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरलं आहे. त्यामुळे नुकसान होत नाही. व्यायाम हा कधीच हार्ट अटॅकचा कारण नसतो. त्यासाठी लाइफस्टाइल जबाबदार ठरते. वेळोवेळी चेकअप करून न घेणं, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं, हृदयाशी संबंधित काही विकार असणं ही कारणं मुख्यत: जबाबरदार असतात”, असं त्याने स्पष्ट केलं.
“माझ्याकडे जे सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनिंगसाठी येतात, त्यांचं लाइफस्टाइल समजून घेण्याचा मी आधी प्रयत्न करतो. त्यांची मेडिकल हिस्ट्री, ब्लड टेस्ट यांची माहिती मिळवतो. एखाद्याची लाइफस्टाइल ठीक नसेल तर त्याला सुधारून त्यानुसार डाएट प्लॅन सांगतो. कोविडदरम्यान अनेकांनी स्वत:च्या मर्जीने कोणाचाही सल्ला न घेता डाएट आणि व्यायाम सुरू केला. ज्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला नसेल, ती कोणत्याही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करणं अपायकारक ठरू शकतं”, असं उत्तर प्रशांत यांनी दिलं.
या सर्व गोष्टींचा फिटनेस बिझनेसवर मोठा परिणाम होत असल्याचंही प्रशांतने यावेळी सांगितलं. “अशा प्रकारच्या बातम्यांमुळे लोकांमध्ये भिती निर्माण होते. कोविड काळात जिम बंद ठेवल्यामुळे आमचं आधीच खूप नुकसान झालं होतं. आता बऱ्याच कालावधीनंतर लोक बाहेर पडू लागेल आहेत आणि व्यायामाचा विचार करत आहेत. मात्र त्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे”, असं तो म्हणाला.