जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे…; भर कार्यक्रमात मुलांसाठी शाहरुखचा खास संदेश
अभिनेता शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. 'जवान', 'पठाण' आणि 'डंकी' हे तिन्ही चित्रपट गाजले. या चित्रपटांसाठी शाहरुखला नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना त्याने मुलांसाठी खास संदेश दिला.
मुंबई : 12 मार्च 2024 | बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानने गेल्या वर्षी ‘जवान’, ‘पठाण’ आणि ‘डंकी’ या तीन चित्रपटांमधून तगडी कमाई केली. जवळपास चार वर्षे ब्रेक घेतल्यानंतर तो मोठ्या पडद्यावर परतला होता. त्याच्या कमबॅकसाठी चाहतेसुद्धा प्रचंड उत्सुक होते. उत्तम अभिनेतासोबतच शाहरुख त्याच्या स्वभावामुळे अनेकचा चर्चेत असतो. पत्नी गौरी खान आणि तीन मुलं आर्यन, सुहाना, अबराम यांच्याप्रती त्याची वागणूक, चाहत्यांसोबतचं त्याचं विनम्र वागणं अनेकदा मनं जिंकून घेतं. नुकताच शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो मुलांसाठी खास संदेश देताना दिसतोय.
एका पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे. शाहरुखच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’ या दोन्ही चित्रपटांनी विविध विभागात पुरस्कार जिंकले. ‘जवान’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स, सर्वोत्कृष्ट अॅक्शनसह इतरही काही पुरस्कार मिळाले. तर ‘पठाण’ला दोन पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार स्वीकारताना शाहरुख मंचावर दोन शब्द बोलण्यासाठी थांबतो. हे पुरस्कार तो पत्नी गौरी आणि मुलांना समर्पित करतो. त्यानंतर तो म्हणतो, “हा पुरस्कार मी माझ्या मुलांना आणि पत्नीला समर्पित करतो. जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे, तोपर्यंत मनोरंजन जिवंत आहे.”
View this post on Instagram
शाहरुखच्या पावलांवर पाऊल टाकत त्याची दोन मुलं मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. सुहानाने ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर दुसरीकडे आर्यन खान सध्या त्याच्या ‘क्लोथिंग ब्रँड’मुळे चर्चेत आला आहे. शाहरुख आणि सुहाना दोघं मिळून त्याच्या या ब्रँडचं प्रमोशन करतायत. याशिवाय तो निर्मिती क्षेत्रातही काम करतोय.
ड्रग्ज प्रकरणात जेव्हा आर्यन खानला अटक झाली होती, तेव्हा शाहरुखने संपूर्ण प्रकरण अत्यंत संयमाने हाताळलं होतं. एक वडील म्हणून त्याने जे काही केलं, ते पाहून चाहत्यांनीही शाहरुखचं कौतुक केलं होतं. विशेष म्हणजे त्या संपूर्ण प्रकरणावर त्याने कोणतीच टिप्पणी दिली नव्हती.