मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘जवान’ हा चित्रपट अखेर आज (गुरुवार) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाकडून निर्मात्यांना आणि कलाकारांनाही प्रचंड अपेक्षा आहेत. जवानच्या प्रिव्ह्यू आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. किंग खानच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्येही प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. गुरुवारी सकाळपासूनच थिएटरमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. ट्विटरवरही चित्रपटाबाबत विविध प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. पहिल्याच दिवशी हा चित्रपट जगभरात कमाईचा शंभर कोटींचा आकडा पार करणार असा अंदाज व्यक्त केला जातोय. यादरम्यान ‘जवान’ चित्रपटासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट ऑनलाइन साइट्सवर लीक झाल्याचं कळतंय.
मीडिया रिपोर्टनुसार प्रदर्शनाच्या काही तासांतच ‘जवान’ हा चित्रपट एचडी प्रिंटमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे. हा चित्रपट तमिळ रॉकर्स, एमपी फोर मुव्हीज, वेगा मूव्हीज आणि फिल्मीझिला या साइट्सवर फुल एचडी प्रिंटमध्ये मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. चित्रपट लीक झाल्यामुळे निर्मातांना कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. शाहरुखचा चित्रपट ऑनलाइन लीक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याचा पठाण हा चित्रपटसुद्धा ऑनलाइन लीक झाला होता. असं असूनही त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.
जवळपास चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुखने यावर्षी ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. त्याच्या काही महिन्यातच त्याचा ‘जवान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाविषयी अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रचंड उत्सुकता आहे. पठाणच्या कमाईचा रेकॉर्ड जवान हा चित्रपट मोडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. इतकंच नव्हे तर जवानची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा जोरदार झाली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी 17 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये शाहरुखसोबतच नयनतारा आणि विजय सेतुपती हे मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय दीपिका पादुकोण. सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोवर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.