Pathaan | ठाण्यातील थिएटरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक; 9 जण ताब्यात
याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतलं आहे. रविवारी संध्याकाळी 'पठाण'चा हा शो सुरू होता. विरोध करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थिएटरमधील डिस्प्ले बोर्डसुद्धा तोडला.
ठाणे: एकीकडे शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट विक्रमी कमाई करतोय, तर दुसरीकडे या चित्रपटावरून सुरू असलेला वाद अजून शमलेला नाही. रविवारी ठाण्यातील एका मॉलमधल्या थिएटरमध्ये पठाणचा शो सुरू होता. त्यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये गोंधळ घातला. थिएटरबाहेर लावलेले ‘पठाण’चे पोस्टर त्यांनी फाडले आणि दगडफेक सुरू केली. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतलं आहे. रविवारी संध्याकाळी ‘पठाण’चा हा शो सुरू होता. विरोध करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थिएटरमधील डिस्प्ले बोर्डसुद्धा तोडला.
पठाण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ या गाण्यातील एका सीनमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. याच भगव्या बिकिनीवरून काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आणि चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.
सेन्सॉर बोर्डाकडे जेव्हा हा चित्रपट गेला, तेव्हा त्यातील काही सीन्स आणि डायलॉग्सवर बोर्डाने कात्री चालवली. त्यानंतर चित्रपटाला होत असलेला विरोध थोडा शमला. मात्र आता चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून पुन्हा एकदा वाद वाढला आहे.
पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाने जगभरात तब्बल 550 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. हा चित्रपट दररोज 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करतोय. प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी पठाणने देशात 70 कोटींची कमाई केली.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट हिंदीसोबत तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला आहे. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी लक्षात घेता ‘पठाण’च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईतही चांगली वाढ पहायला मिळाली. यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसह जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत.