मुंबई: अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये फार क्रेझ आहे. जवळपास चार वर्षांनंतर शाहरुख या चित्रपटातून मुख्य भूमिकेच्या रुपात कमबॅक करत आहे. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटावरून देशभरात वादही सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख चित्रपटाविषयी, त्यातील त्याच्या भूमिकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. येत्या 25 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘पठाण’च्या प्रदर्शनापूर्वी यशराज फिल्म्सने एक व्हिडीओ जारी केला आहे, या व्हिडीओत शाहरुख त्याच्या चित्रपटाविषयी मोकळेपणे व्यक्त होताना दिसत आहे. शाहरुख म्हणतो, “मी 32 वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीत एक ॲक्शन हिरो बनण्यासाठी आलो होतो. मात्र ते मी बनू शकलो नाही. कारण त्यांनी मला एक रोमँटिक हिरो बनवून टाकलं. मला फक्त ॲक्शन हिरो बनायचं होतं. मी डीडीएलजेवरही (दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे) प्रेम करतो. मला राहुल, राज आणि ती सर्व चांगली मुलं आवडतात. पण मला नेहमीच असं वाटायचं की मी एक ॲक्शन हिरो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे माझं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे.”
King Khan’s 32-year-old dream comes true as he turns an action hero in Pathaan! Watch all the revelations of @iamsrk as he gears up for the release of his first out and out action film #Pathaan
You can’t miss this one! pic.twitter.com/QzRvEZZt3T— Yash Raj Films (@yrf) January 18, 2023
‘पठाण’मधील भूमिकेविषयी तो पुढे म्हणतो, “पठाण हा एक साधा माणूस आहे, जो बऱ्याच कठीण गोष्टींना हाताळतो. मला वाटतं की तो खोडकर आहे, तितकाच तो धाडसी आहे. पण त्याचा दिखावा तो कधीच करत नाही. तो विश्वासू आणि प्रामाणिकसुद्धा आहे. माझ्या मते तो पूर्णपणे भारताला आपल्या आईच्या रुपात पाहतो.”
‘पठाण’मधील दीपिका पदुकोणच्या भूमिकेविषयीही तो व्यक्त झाला. “या चित्रपटाला दीपिकाच्या तोडीच्या एका व्यक्तीची गरज होती. जी बेशर्म रंगसारखं गाणंही करू शकेल, जी ॲक्शन सीन्स पण करू शकेल. यातील एका दृश्यात ती एका मुलाशी भिडते. ती इतकी धाडसी आहे की ते हे सर्व करू शकते. असं अनोखं समीकरण फक्त दीपिकासोबतच मिळू शकतं. एका ॲक्शन फिल्मच्या हिरोइनच्या दृष्टीने तिच्या भूमिकेला अनेक छटा आहेत”, असं किंग खानने सांगितलं.