नवी दिल्ली: कारच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर कारचालकाने 20 वर्षीय तरुणीला 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची मन विषण्ण करणारी घटना दिल्लीजवळ घडली. याप्रकरणी सात आरोपी पोलीस कोठडीत आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अंजली सिंहच्या कुटुंबीयांच्या मदतीला आता अभिनेता शाहरुख खान धावून आला आहे. शाहरुखच्या मीर फाऊंडेशनकडून अंजलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.
अंजली ही तिच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती. तिची आई सध्या डायलिसीसवर आहे. दोन बहिणी आणि दोन भावांचंही पालनपोषण ती करत होती. गेल्या वर्षी तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. तेव्हापासून ती घर चालवत होती. एका कंपनीत रात्री उशिरापर्यंत पार्ट टाइम नोकरी करून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. अशा परिस्थितीत मीर फाऊंडेशनने आई आणि भावंडांची आर्थिक मदत केली.
एका कारने दुचाकीवर असलेल्या तरुणीला धडक दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतरही कार न थांबवता चालकाने मृत तरुणीला सुलतानपुरी ते कांझावालापर्यंत फरफटत नेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. याप्रकरणी दीपिक खन्ना, अमित खन्ना, कृष्णन, मिथुन आणि मनोज मित्तल या पाच जणांना आधी अटक झाली.
हा दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा असून आरोपी प्रभावशाली कुटुंबातील असले तरी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली जावी, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा अंजलीच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं. केजरीवाल यांनी पीडितेच्या आईशी बातचित केल्यानंतर वकील मिळवून देण्याचंही आश्वासन दिलं. अंजलीला न्याय मिळवून देणार, असं ते म्हणाले.