इमारतीला लागली आग, अभिनेत्याच्या पत्नीसह आत अडकली 16 महिन्यांची मुलगी; असे वाचवले प्राण
या घटनेनंतर शाहीरची पत्नी रुचिका हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याविषयीची माहिती दिली. ही पोस्ट वाचल्यानंतर सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी चिंता आणि काळजी व्यक्त केली.
मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शाहीर शेखची पत्नी आणि कुटुंबीयांनी बुधवारी (25 जानेवारी) मध्यरात्री आगीच्या भयानक घटनेचा सामना केला. या घटनेनंतर शाहीरची पत्नी रुचिका हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याविषयीची माहिती दिली. ही पोस्ट वाचल्यानंतर सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी चिंता आणि काळजी व्यक्त केली. शाहीरची पत्नी रुचिका तिच्या माहेरी राहायला गेली होती. त्याच इमारतीला आग लागली आणि त्यावेळी घरात रुचिकासोबत तिची 16 महिन्यांची मुलगी, आई आणि व्हीलचेअरवर बाबा होते.
नेमकं काय घडलं?
आगीची संपूर्ण घटना आणि कशा पद्धतीने शाहीरने कुटुंबीयांचे प्राण वाचवले याविषयी तिने सविस्तर या पोस्टमध्ये लिहिलं आहे. ‘मध्यरात्री दीड वाजता आम्हाला समजलं की इमारतीला आग लागली आहे. जेव्ही आम्ही दार उघडलं तेव्हा समोर काळाकुट्ट धूर होता. ज्यातून आम्ही बाहेर जाऊ शकणार नव्हतो. आम्हाला घरातच थांबावं लागलं होतं. घाबरलेल्या अवस्थेतच मी शाहीरला फोन करून घटनेची माहिती दिली. माझे बाबा व्हीलचेअर रुग्ण आहेत आणि माझी मुलगी फक्त 16 महिन्यांची आहे. लोकांनी आरडाओरडा केला तरी 15 व्या मजल्यावरून आम्हाला इमारतीबाहेर जाणं शक्य नव्हतं,’ असं तिने लिहिलं.
अग्निशमन दलाचे जवान वाचवायला येण्यापूर्वी काय केलं याविषयी सांगताना तिने पुढे लिहिलं, ‘आम्ही ओले टॉवेल दाराच्या खाली ठेवले, जेणेकरून बाहेर धूर आत येऊ शकणार नाही. यादरम्यान अग्निशामक दलाच्या एका जवानाने आम्हाला ओले रुमाल नाकावर ठेवण्यास सांगितलं, जेणेकरून धूर आमच्या नाकात जाणार नाही. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरात लवकर आमची सुटका केली जाईल, असं आश्वासन त्याने आम्हाला दिलं. यादरम्यान शाहीर आणि इतर काही जण फायर इंजिन्ससाठी वाट मोकळी करण्यासाठी इमारतीखाली पार्क केलेल्या गाड्या हाताने उचलून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते.’
View this post on Instagram
‘अखेर मध्यरात्री साडेतीन वाजता अग्निशमन दलाचे चार जवान, शाहीर आणि त्याचा भाऊ घरात आम्हाला वाचविण्यासाठी आले. सर्वांत आधी आम्ही मुलगी अनाया आणि आईला सुरक्षित घराबाहेर काढलं. त्यानंतर शाहीर आणि त्याच्या भावाने अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने व्हीलचेअरवर असलेल्या माझ्या वडिलांना उलचून 15 मजले उतरून खाली नेलं. तोपर्यंत पहाटेचे 5 वाजले होते’, अशा शब्दांत तिने अनुभव सांगितला.
या पोस्टमध्ये रुचिकाने अग्निशामक दलाच्या जवानांचे आभार मानले. त्याचसोबत आगीची अशी घटना घडल्यास कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हेसुद्धा तिने लिहिलं.