मुंबई : अभिनेता शाहिद कपूरने त्याच्या आजवरच्या करिअरमध्ये अनेक दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. कधी चॉकलेट बॉय बनून तर कधी चौकटीबाहेरच्या भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतंच त्याने ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. शाहिदचा पहिलावहिला ओटीटी प्रोजेक्ट यशस्वी ठरला आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर त्याची ‘फर्जी’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. यामध्ये त्याने साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती आणि अभिनेत्री राशी खन्नासोबत भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमध्ये प्रोफेशनल आर्टिस्टची भूमिका साकारणाऱ्या शाहिदची बनावट नोटा बनवण्याची कहाणी, त्याची गरिबी आणि लव्ह अँगल प्रेक्षकांना फारच आवडला आहे. फर्जीला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून या वेब सीरिजने नवा विक्रम रचला आहे.
फर्जीचा पहिला सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये शाहिद कपूरच्या दमदार अभिनयाला प्रेक्षक-समिक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. म्हणून या सीरिजने नवा विक्रम रचला आहे. याची माहिती खुद्द शाहिदने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. फर्जी ही देशातील सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सीरिज ठरली आहे, असं त्याने म्हटलंय.
शाहिद कपूरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. या पोस्टद्वारे त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत दुसऱ्या सिझनविषयी प्रश्न विचारले आहेत. फर्जीने ओटीटीवर कोणकोणत्या वेब सीरिजला मागे टाकलंय, याचीही माहिती शाहिदने या पोस्टद्वारे दिली आहे.
फर्जी ही देशात सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज ठरली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राशी खन्नाची ‘रुद्र: द एड ऑफ डार्कनेस’ ही सीरिज आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ‘मिर्झापूर 2’, चौथ्या क्रमांकावर ‘पंचायत 2’ आणि पाचव्या क्रमांकावर ‘क्रिमिनल जस्टिस बिहाइंड क्लोस्ड डोर्स’ आहे. सहाव्या क्रमांकावर ‘द नाइट मॅनेजर’, सातव्या क्रमांकावर ‘द फॅमिली मॅन 2’, आठव्यावर ‘ताजा खबर’, नवव्या क्रमांकावर ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ आणि दहाव्या क्रमांकावर ‘स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी’ आहे.