प्रोडक्शन हाऊसवर कर्जाचा डोंगर, कित्येक कलाकारंचे पैसे थकवल्याचा आरोप; ‘या’ चित्रपटाला हो म्हणणं शाहिद कपूरला महागात
अभिनेता शाहिद कपूरला एका चित्रपटाला हो म्हणणं फारच महागात पडलं आहे. प्रोडक्शन हाऊसवर कर्जाचा डोंगर असल्याने शाहिदचा 'बिग बजेट' चित्रपटाचे शुटींगच थांबले आहे. प्रोडक्शन हाऊसवर कित्येक कलाकारंचे पैसे थकवल्याचा आरोपही आहे. त्यामुळे आता पुढे जाऊन शाहिदलाही याच अडचणींना सामोरं जावं लागणार का असा प्रश्न आहे.
अभिनेता शाहिद कपूरच्या चित्रपटावरील ग्रहण काही हटताना दिसत नाहीये. प्रोडक्शन हाऊसवर कर्जाचा डोंगर असल्याने शाहिदचा ‘बिग बजेट’ चित्रपटाचे शुटींगच थांबले आहे. शाहिदच्या 500 कोटींच्या चित्रपटाला मोठा ब्रेक लागला आहे. शाहिदचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘अश्वत्थामा: द सागा कंटीन्यूज’ला सध्या थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे चित्रपट नेमका कधी रीलिज होणार आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
चित्रपटाचे बजेट 500 कोटींहून जास्त
चित्रपटाचे बजेट 500 कोटींहून जास्त झाले होते. त्यानंतर आता निर्मात्यांनी चित्रपटाचे काम थांबवल्याचे समजते. हा चित्रपट महान योद्धा अश्वत्थामा यांची महाकथा पडद्यावर आणणार होता, पण आता तो थांबवण्यात आला आहे.
‘अश्वत्थामा: द सागा कंटिन्यूज’ या पौराणिक ॲक्शनपटाची घोषणा यावर्षी मार्चमध्ये करण्यात आली. या चित्रपटात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नड चित्रपट दिग्दर्शक सचिन बी. रवी करत आहेत.रिपोर्टनुसार चित्रपटाचे बजेट 500 कोटींच्या वर पोहोचले असल्याने हा प्रोजेक्ट मध्येच थांबवण्यात आला.
बजेटमुळे सिनेमा थांबला
‘अश्वत्थामा: द सागा कंटिन्यूज’ हा चित्रपट ॲमेझॉन स्टुडिओसह निर्माता वासू भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवला जात होता. पण बजेटची कमतरता आणि लॉजिस्टिक आव्हानांमुळे चित्रपट थांबवण्यात आला.
रिपोर्टनुसार हा चित्रपट आंतरराष्ट्रीय कल्पनारम्य-ॲक्शन चित्रपटांशी स्पर्धा करू शकेल असे काहीतरी बनवण्याची कल्पना होती. अश्वत्थाम्याचे चित्रीकरण अनेक देशांत होणार होते. पण आंतरराष्ट्रीय स्थळांवर शूटिंग बजेटमध्ये करणे अशक्य झाले. हा चित्रपट थांबण्यामध्ये पूजा एंटरटेनमेंटचे कर्ज हा आणखी एक मोठा घटक ठरला.
प्रोडक्शन हाऊस आधीच वादाच्या भोवऱ्यात
वासू भगनानी आणि त्यांचे प्रोडक्शन हाऊस पूजा एंटरटेनमेंट आधीपासूनच वादात आहेत. अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केलेल्या कलाकारांची थकीत फी परत न केल्याचा आरोप निर्माता आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसवर आहे. त्यात आता या चित्रपटाचीही भर पडली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट नक्की पूर्ण होणार का हाच मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे.