KK Goswami | ‘शक्तीमान’ फेम अभिनेत्याच्या कारला लागली आग; थोडक्यात बचावला मुलगा
कारला आग कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर मुंबई पोलिसांनी या आगीचं मूळ कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
मुंबई : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेते के. के. गोस्वामी यांना तुम्ही बालपणीच्या आवडत्या मालिकांमध्ये आवर्जून पाहिलं असेल. ‘शक्तीमान’, ‘गुटूर गू’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. नुकतंच के. के. गोस्वामी यांना मुंबईत एका अपघाताचा सामना करावा लागला. त्यांच्या कारला अचानक आग लागली. या घटनेदरम्यान ते मुंबईतच होते. ही घटना सिटी सेंटरच्या एसव्ही रोडवर घडली. के. के. गोस्वामी यांचा मुलगा त्याच्या वडिलांच्या कारमधून कॉलेजला जात होता, तेव्हा अचानक कारने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
थोडक्यात बचावला 21 वर्षांचा मुलगा
के. के. गोस्वामी यांचा 21 वर्षांचा मुलगा नवदीप कार चालवत असताना अचानक आग लागली. सुदैवाने अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत गोस्वामी यांचा मुलगा थोडक्यात बचावला. त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र कारला आग कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर मुंबई पोलिसांनी या आगीचं मूळ कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
के. के. गोस्वामी यांचा संघर्ष
के. के. गोस्वामी यांचं पूर्ण नाव कृष्णकांत गोस्वामी असं आहे. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, भोजपुरी आणि इतर भाषांमध्येही काम केलं आहे. ते मूळचे बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील आहेत. अभिनेता बनण्याआधी ते गावी एक स्टुडिओ चालवायचे. तीन फूट उंची असलेल्या गोस्वामी यांनी मुंबईत आल्यानंतर बराच संघर्ष केला. त्यांनी बारमध्येही नोकरी केली होती. मात्र आज ते इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत.