मुंबई : अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया ही करण जोहरच्या ‘बेधडक’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात कणार आहे. मात्र बॉलिवूड पदार्पणाआधीच शनायाने सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. विविध पार्ट्यांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये तिला इतर स्टार किड्ससोबत आवर्जून पाहिलं जातं. नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये शनायाचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. मात्र रॅम्प वॉकमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. शनायाने तिच्या इन्स्टाग्रामवर या रॅम्प वॉकचा व्हिडीओ पोस्ट केला. मात्र त्यावर नेटकऱ्यांकडून नकारात्मक प्रतिक्रियांचा भडीमार होतोय.
लॅक्मे फॅशन वीकमध्ये शनायाने पिवळ्या रंगाची सीक्वेन साडी नेसली होती. डिझायनर अर्पिता मेहतासाठी ती शॉ स्टॉपर होती. शनायाचा हा लूक अत्यंत ग्लॅमरस असला तरी तिचा रॅम्प वॉक नेटकऱ्यांना आवडला नाही. काहींनी तिला प्लास्टिकची बाहुली असं म्हटलंय. तर काहींनी घराणेशाहीवरून तिच्यावर टीका केली आहे.
एकीकडे ट्रोलर्सनी तिच्यावर टीका केली तरी आई महीप कपूर, चुलत बहिणी खुशी आणि जान्हवी कपूर, अंशुला कपूर यांनी शनायाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. शनाया सध्या 23 वर्षांची आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात करिअर करणार आहे. स्टार किड्सना बॉलिवूडमध्ये लाँच करण्यासाठी प्रसिद्ध असलेला करण जोहर शनायाला सुद्धा लाँच करणार आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाचा फर्स्ट लूकसुद्धा प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगला अद्याप सुरूवात झाली नाही.
शनायानं अजून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं नसलं तरी सोशल मीडियावर तिची चांगली फॅन फॉलोइंग आहे. अनेकदा ती तिच्या चाहत्यांसाठी डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. नेटकऱ्यांना तिचे हे व्हिडीओ खूप पसंतीस येतात. संजय कपूर यांची मुलगी शनाया ही अनिल कपूर यांची भाची आहे. गेल्या वर्षी शनायाने तिच्या करिअरमधला पहिलाच रॅम्प वॉक केला होता. मात्र तेव्हासुद्धा ती ट्रोल झाली होती. त्यावेळी प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या शोसाठी शनाया शो स्टॉपर होती.
‘ही बदकासारखी का चालतेय’, असं एकाने विचारलं. तर ‘आतापर्यंतचा हा सर्वात वाईट ऱॅम्प वॉक होता’, असं दुसऱ्याने म्हटलं. काहींनी तिला इतर अभिनेत्रींकडून शिकण्याचा सल्लाही दिला. दुसरीकडे शनायाची खास मैत्रीण सुहाना खान आणि अनन्या पांडे यांनी तिचं कौतुक केलं होतं.