तुम्ही महाराजांच्या नावाचा वापर करुन…; अभिनेता शरद केळकरने व्यक्त केली खंत
अभिनेता शरद केळकरने 'तान्हाजी' सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. आता शरदने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये एक वेगळा अनुभव सांगितला आहे.

सध्या सगळीकडे ‘छावा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने पुष्पा, जवान, पठाण सारख्या अनेक बड्या कलाकारांच्या चित्रपटाला टक्कर दिली आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची कथा दाखवण्यात आली आहे. दरम्यान, ‘तान्हाजी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महराजांची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकरने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नुकताच शरद केळकरने डिजिटल कॉमेंट्रीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला ‘तान्हाजी’ चित्रपटातील भूमिकेविषयी विचारण्यात आले होते. त्यावर शरदने, ‘हे जनतेकडून मला मिळालेलं प्रेम आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही तान्हाजी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मला असंख्य कार्यकमांसाठी आमंत्रण देण्यात आले होते. त्यांची एकच विनंती असायची की महाराजांच्या वेशभुषेत या. मग मी अशा ठिकाणी जायचे नाही असे ठरवले. त्यांना स्पष्ट नकार दिला’ असे म्हटले.
पुढे शरद म्हणाला की, ‘ माझा एक नियम आहे की ज्या व्यक्तीमुळे मला इंडस्ट्रीमध्ये इतका सन्मान मिळाला त्याचा कधीही स्वत:साठी वापर करायचा नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करणे मला कधीच जमले नाही. सर आमच्या सिनेमामध्ये महाराजांचे सहा सीन आहेत, तुम्ही कराल का? अशी अनेकदा विचारण होते. पण मी थेट नकार देतो. मला असे करायचे नाही. कारण, तुम्ही फक्त महाराजांचा वापर करु इच्छिता. त्यांचा नावाचा उपयोग करून तुम्ही त्या सिनेमाला मोठं करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही महाराजांच्या जीवनावर सिनेमा बनवा मी नक्की करेन.’




‘तान्हाजी’ सिनेमा विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात शरद केळकर, अजय देवगण, काजोल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटातील शरद केळकरची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. पण ही भूमिका गाजल्यानंतर शरदने इतर सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्या नकार दिला.