मुंबई: मराठी कलाविश्वातील दिग्गज कलाकार शरद पोंक्षे हे सध्या त्यांच्या आयुष्यातील अत्यंत अभिमानचा क्षण अनुभवत आहेत. कारण त्यांच्या लाडक्या लेकीने वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. खुद्द शरद यांनी फेसबुकवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. ‘सिद्धी शरद पोंक्षे आज प्रायव्हेट पायलट झाली. असंख्य अडचणीतून मार्ग काढत ती इथपर्यंत पोहोचली. अभिनंदन सिद्धी,’ अशी भावूक पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
जुलै महिन्यात त्यांनी सिद्धीला मुंबई विमानतळावर निरोप देतानाचा फोटो पोस्ट केला होता. ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं लिहित त्यांनी सिद्धीसोबतचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर आता सिद्धीचा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
शरद पोंक्षे यांना स्नेह हा मुलगा तर सिद्धी ही मुलगी आहे. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत स्नेहने नुकतंच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तर सिद्धी आता प्रायव्हेट पायलट बनली आहे.
शालेय जीवनापासूनच सिद्धी अत्यंत हुशार असल्याचं शरद पोंक्षेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. बारावीत तिला विज्ञान शाखेत 87 टक्के गुण मिळाले होते. त्यावेळीसुद्धा पोंक्षेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. ‘2019 मध्ये माझ्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. रुग्णालयात येऊन, कॉलेजचा अभ्यास करून एवढ्या टेंशनमध्ये असतानाही पिल्लूनं 87 टक्के मार्क बारावी विज्ञान शाखेत मिळवले. अभिमान वाटला मला आणि सतत वाईट बातम्या चहूबाजूंनी येत असताना एवढी चांगली बातमी सांगायला आनंद होतोय’, असं त्यांनी लिहिलं होतं.