Pak Flood: पाकिस्तानी सेलिब्रिटींचा कहर; इथे पूर तर तिथे अवॉर्ड फंक्शनमध्ये डान्स
अभिनेत्रीने पाकिस्तानी सेलिब्रिटींना सुनावलं; "देश पुराचा सामना करत असताना तुम्ही तिथे.."
मुंबई: भारताच्या शेजारील देश पाकिस्तान (Pakistan) गेल्या अनेक दिवसांपासून भीषण पूरपरिस्थितीचा (Flood) सामना करतोय. अशा परिस्थितीत देशाच्या मदतीला कोणीच धावून येत नसल्याची तक्रार वारंवार तिथल्या सेलिब्रिटींनी केली. पाकिस्तानची फिल्म इंडस्ट्री ‘लॉलिवूड’ म्हणून ओळखली जाते. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री नूर बुखारीने ट्विट करत लॉलिवूडच्या सेलिब्रिटींची निंदा केली होती. आपल्याच देशाच्या मदतीला कोणी धावून येत नाही, अशी तक्रार तिने केली होती. त्यानंतर आता अभिनेत्री शर्मिला फारूखीनेही (Sharmila Faruqui) इतर सेलिब्रिटींना सुनावलं आहे.
एकीकडे देशातील जनता पाण्याच्या टंचाईचा सामना करतेय तर दुसरीकडे हे सेलिब्रिटी टोरंटो फेस्टिव्हलला जात आहेत, असं तिने म्हटलं. शर्मिलाने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली. पूरपरिस्थितीचा सामना करणाऱ्या देशातील जनतेची मदत न करता सेलिब्रिटी अवॉर्ड फंक्शनला जात असल्याची तक्रार तिने केली.
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली ही काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी तिथे पोहोचली होती. शर्मिलाने दोन फोटोंचा कोलाज सोशल मीडियावर पोस्ट केला. एका फोटोमध्ये अनेक सेलिब्रिटी पीडितांची मदत करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये पाकिस्तानी सेलिब्रिटी हे टोरंटो अवॉर्ड फंक्शनमध्ये मजामस्ती करताना पहायला मिळत आहेत.
View this post on Instagram
‘इथे अँजेलिना जोली आपल्या देशातील पूरपरिस्थितीचा आढावा घेताना दिसतेय. पीडितांची मदत करताना करतेय. आपल्या या वागणुकीने ती अनेकांना प्रेरणा देतेय. पाकिस्तानची मदत करण्याचं आवाहन ती इतर देशांना करतेय. मात्र याउलट आपले पाकिस्तानी कलाकार टोरंटोमध्ये मजामस्ती करत आहेत. आपल्या परफॉर्मन्सची तयारी करत आहेत’, अशा शब्दांत शर्मिलाने सुनावलं.
पाकिस्तानी सेलिब्रिटींवर निशाणा साधत तिने पुढे लिहिलं, ‘यापैकी एकाही सेलिब्रिटीने पूरपरिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न नाही केला. पीडितांची थोडीतरी मदत करा. अवॉर्ड शो, परफॉर्मन्स, सांस्कृतिक कार्यक्रम यांवर माझाही पूर्ण विश्वास आहे. मात्र तिथे जाण्यापूर्वी जर यांनी आपल्या देशातील लोकांची मदत केली असती तर बरं झालं असतं. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आपल्या देशात माणुसकीचीच कमतरता जाणवू लागली आहे. पूराचा सामना करणाऱ्या त्या सर्वसामान्य लोकांमुळेच आपल्याला स्टारडम मिळालं आहे.’