मनोहर जोशी यांच्या निधनानंतर नात शर्वरी वाघला अश्रू अनावर; भावूक करणारा क्षण
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं शुक्रवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मनोहर जोशी यांच्या अंत्यविधीला नात शर्वरी वाघचे डोळे पाणावले होते. अत्यंत भावूक करणाऱ्या या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
मुंबई : 24 फेब्रुवारी 2024 | शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत महापौर ते लोकसभा अध्यक्षपद अशी विविध महत्त्वाची पदं भूषविलेले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची नात आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ अत्यंत भावूक झाली होती. मनोहर जोशी यांची कन्या नम्रता वाघ असून शर्वरी ही नम्रता यांची मुलगी आहे. आजोबांच्या अंत्यविधीला शर्वरी तिच्या कुटुंबीयांसोबत उपस्थित होती. आजोबांचं पार्थिव पाहून तिचे डोळे पाणावले होते.
मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी शर्वरीसुद्धा तिच्या कुटुंबीयांसोबत तिथे उपस्थित होती. आजोबांच्या पार्थिवाला पाहून शर्वरी भावूक झाली होती. त्यांच्यासमोर हात जोडून तिने त्यांना अखेरचा निरोप दिला. मनोहर जोशी यांच्या अंत्यविधीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे त्यांच्या आईसह पोहोचले होते. याशिवाय तमाम मोठे नेते आणि सेलिब्रिटी याठिकाणी उपस्थित होते.
पहा व्हिडीओ
#WATCH | Mumbai | Maharashtra Governor Ramesh Bais paid last respects to former CM Manohar Joshi and met his family. pic.twitter.com/VA7FqMi4RG
— ANI (@ANI) February 23, 2024
शर्वरी ही नम्रता वाघ आणि शैलेश वाघ यांची मुलगी आहे. शर्वरीने ‘बंटी और बबली 2’, ‘ऑल द बेस्ट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. याशिवाय तिने काही वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते.
मनोहर जोशी यांच्या निधनानंतर शिवसेनेचा ‘कोहिनूर हिरा’ हरपला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. शिवसेनेत ‘सर’ या बिरुदाने प्रसिद्ध असलेले मनोहर जोशी गेल्या मे महिन्यापासून आजारी होते. शिवसेनेच्या कोणत्याही निर्णयप्रक्रियेत बाळासाहेब ठाकरे नेहमी जोशी यांच्याशी सल्लामसलत करीत असत. शिवसेनेच्या अष्टप्रधान मंडळात मनोहर जोशी यांचं स्थान वरचं होतं. मनोहर जोशी यांनी नगरसेवक, महापौर, विधान परिषद आणि विधानसभेची आमदारकी, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यसभा सदस्य, लोकसभा अध्यक्ष अशी विविध पदं भूषविली होती. प्रत्येक पदाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला.