‘दुसऱ्या सिझनचं शूटिंग संपूनही पहिल्याचे पैसे मिळाले नाही..’; निर्मात्यांवर भडकला शशांक केतकर
अभिनेता शशांक केतकरने त्याच्या इन्स्टा स्टोरीमधील पोस्टद्वारे 'गुनाह' या हिंदी वेब सीरिजच्या निर्मात्यांबद्दल तक्रार केली आहे. दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अद्याप त्याला पहिल्या सिझनचे पैसे मिळाले नव्हते.
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर घराघरात पोहोचला. यानंतर त्याने विविध मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. शशांकने मराठीसोबत हिंदीतही काम केलंय. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘गुनाह’ या वेब सीरिजमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या सीरिजचा दुसरा सिझन यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अशातच शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहित निर्मात्यांबद्दल तक्रार केली आहे. दुसऱ्या सिझनचं शूटिंग संपलं तरी पहिल्या सिझनचे पैसे परवापर्यंत मिळाले नव्हते, असं त्याने म्हटलंय. इतकंच नव्हे तर पहिल्या सिझनचे पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय दुसऱ्या सिझनचं डबिंग करणार नाही, अशी अट शशांकने निर्मात्यांना घातली असता काही सीन्समध्ये त्याच्या आवाजाऐवजी दुसऱ्या एका डबिंग आर्टिस्टकडून डायलॉग्स डब करून घेतल्याचा त्याने आरोप केला आहे.
शशांक केतकरची पोस्ट-
‘गुनाह या वेब सीरिजचा दुसरा सिझन आजपासून सुरू झाला आहे. पण.. सिझन 2 चं शूटिंग संपलं होतं तरी पहिल्या सिझनचे पैसे परवापर्यंत मिळाले नव्हते आणि सिझन 1 चे पैसे मिळाल्याशिवाय सिझन 2 चं मी डबिंग करणार नाही अशी अट घातल्यामुळे अनेक सीन्समध्ये माझ्या आवाजाऐवजी एका डबिंग आर्टिस्टकडून वाक्य डब करून घेतली आहेत. याबद्दल मी सविस्तर बोलेनच..’, अशी पोस्ट शशांकने लिहिली आहे.
‘गुनाह’ ही वेब सीरिज 3 जून 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये गश्मीर महाजनी, सुरभी ज्योती आणि झयान खान यांच्या भूमिका होत्या. तर शशांकचीही या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका होती. दुसऱ्या सिझनचं शूटिंग संपूनही पहिल्या सिझनचे पैसे न मिळाल्याने शशांकने नव्या सिझनचं डबिंग न करण्याची अट घातली होती. तरीही त्याला त्याच्या मेहनतीचे पैसे न देता थेट दुसऱ्या डबिंग आर्टिस्टकडून काही डायलॉग्स डब करून घेण्यात आलं. याविषयी सविस्तर बोलणार असल्याचंही शशांकने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय. शशांकच्या या पोस्टवर सीरिजच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.