आणखी काही बोलायची गरज आहे का? सोनाक्षीच्या वादावरून शत्रुघ्न सिन्हा यांनी सोडलं मौन
कवी कुमार विश्वास यांनी सोनाक्षीच्या आंतरधर्मीय लग्नावरून एका कार्यक्रमात अप्रत्यक्ष टिप्पणी केली होती. त्यावर आता सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी मौन सोडलं आहे. एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित त्यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘शक्तीमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रामायणाबद्दलच्या ज्ञानावरून निशाणा साधला होता. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सोनाक्षीला रामायणाशी संबंधित प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. त्यावरून त्यांनी तिच्यावर आणि तिच्या संगोपनावर टीका केली होती. त्यानंतर सोनाक्षीने त्यांना सडेतोड दिलं होतं. सोनाक्षीच्या पोस्टनंतर मुकेश खन्ना यांनी पश्चात्ताप व्यक्त केला आणि भविष्यात हा विषय पुन्हा काढणार नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर हा विषय इथेच संपला असं वाटत असतानाच प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी सोनाक्षीच्या आंतरधर्मीय लग्नावरून एका कार्यक्रमात अप्रत्यक्षपणे टिप्पणी केली. त्यावर आता शत्रुघ्न सिन्हा यांनी मौन सोडलं आहे.
एका कार्यक्रमात कुमार विश्वास म्हणाले होते, “आपल्या मुलांना सीताजींच्या बहिणींची नावं, भगवान रामाच्या भावंडांची नावं शिकवा, पाठ करायला लावा. एक संकेत देतोय, ज्यांना समजेल त्यांनी टाळ्या वाजवा. आपल्या मुलांना रामायण ऐकवा, गीता वाचायला लावा. अन्यथा असं न होवो की तुमच्या घराचं नाव तर रामायण असेल मात्र तुमच्या घरातील श्रीलक्ष्मीला कोणी दुसरा येऊन घेऊन जाईल.” सोनाक्षीने अभिनेता झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्न केलं. यावरूनच त्यांनी निशाणा साधल्याचं म्हटलं गेलंय. त्यांच्या या टिप्पणीनंतर सुरेंद्र राजपूत आणि सुप्रिया श्रीनेत यांसारख्या राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे कुमार विश्वास यांना सुनावलं होतं. आता सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनीसुद्धा यासंदर्भात ट्विट केलंय.
शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘तुमच्या निरीक्षणासाठी आणि माहितीसाठी मी इथे नुकत्याच घडलेल्या काही घटना, वक्तव्ये, कृती आणि प्रतिक्रियांचा काही भाग जोडतोय. माझ्या डोळ्याचा तारा.. माझी मुलगी सोनाक्षी सिन्हा, जिला नेहमीच माझ्याकडून पूर्ण पाठिंबा, प्रेम आणि आशीर्वाद मिळत राहील.. तिच्याशी संबंधित या प्रतिक्रिया आहेत. तिने हे प्रकरण अत्यंत हुशारीने, योग्य वेळी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे, असं म्हणायला हवं. तिच्या प्रतिक्रियेचं खूप कौतुक झालं. राजकारणातील आणि काँग्रेस पक्षातील आमच्या काही मित्रांनीही ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्याने मी भारावून गेलोय.’
For your perusal, understanding & appreciation forwarding here a recent episode of statements,actions & counter reactions by/on the apple of our eye #SonakshiSinha who always has my full support, love & blessings. Must say she has handled the matter wisely, timely & very well.…
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) December 26, 2024
या ट्विटमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत आणि ‘वंडर वुमन’ सुप्रिया श्रीनेत ज्यांचं वक्तृत्व अतुलनीय आहे. त्यांनी तर्कशुद्ध मुद्दे मांडले आणि अतिशय योग्य, कौतुकास्पद अशी प्रतिक्रिया दिली. आता मुकेश खन्ना यांनीसुद्धा उत्तर दिलंय, त्यामुळे सोनाक्षी आणि आमच्या बाजूने हे प्रकरण मिटलंय. यावर अजून काही बोलायची गरज आहे का? तुमच्या माहितीसाठी मी विविध मुद्दे इथे शेअर करत आहे. जय हिंद!’
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत कुमार विश्वास यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या, “कुमार विश्वासजी, तुम्ही सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावरून जी खालच्या पातळीची टिप्पणी केली त्यावरून तुमच्या मनात महिलांविषयी असलेले विचारसुद्धा सर्वांसमोर आले. अन्यथा तुमच्या घरातील लक्ष्मी कोणी घेऊन जाईल, असं तुम्ही म्हणालात. मुलगी ही एखादी वस्तू आहे का, जी कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतं? तुमच्यासारखे लोक कधीपर्यंत महिलांना आधी पिता आणि नंतर पतीची संपत्ती समजत राहाल?”