तुरुंगातून बाहेर येताच तुनिशाबाबत हे काय बोलून गेला शिझान; चकीत करणारं वक्तव्य
तुनिशाच्या आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन गोष्टी समोर आल्या आहेत. तुनिशाच्या कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी केली जातेय. पोलिसांनी तुनिशाच्या आत्महत्या प्रकरणात लव्ह-जिहादच्या अँगलने तपास करावा, अशी मागणी तिच्य्या काकांनी केली होती.
मुंबई : अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खानला अखेर दोन महिन्यांनी जामीन मंजूर झाला. वसईच्या सत्र न्यायालयाने एक लाख रुपयांच्या हमीपत्रावर त्याचा जामीन मंजूर केला. रविवारी शिझान तुरुंगातून बाहेर आला. यावेळी त्याच्या दोघी बहिणी त्याला भेटण्यासाठी आल्या होत्या. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजतोय, अशी प्रतिक्रिया शिझानने दिली. यावेळी त्याने तुनिशाबद्दलही वक्तव्य केलं. त्याचसोबत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आई आणि बहिणींना पाहून डोळ्यांत पाणी आलं, असंही तो म्हणाला.
तुनिशा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी वसईतील तिच्या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शिझानसोबत असलेलं प्रेमसंबंध तुटल्याने ती नैराश्यात होती. तिच्या आत्महत्येला शिझान हाच जबाबदार असल्याचा आरोप तुनिशाच्या आईने केला होता. त्यानंतर पोलिसांनी शिझान खानला अटक केली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता.
तुनिशाबद्दल काय म्हणाला शिझान?
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत शिझानला तुनिशाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “मला तिची आठवण येतेय. जर ती आज जिवंत असती तर माझ्यासाठी ती लढली असती.” तुनिशाच्या आत्महत्येच्या पंधरा दिवस आधी तिचं शिझानसोबत ब्रेकअप झालं होतं.
शिझान पुढे म्हणाला, “आज मला स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळतोय आणि मी त्याचा अनुभव घेऊ शकतोय. ज्या क्षणी मी माझ्या आईला आणि बहिणींना पाहिलं, तेव्हाच माझ्या डोळ्यात अश्रू होते. त्यांच्याजवळ येऊन मी खूप खुश आहे. कुटुंबीयांसोबत असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पुढील काही दिवस मी फक्त माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून आराम करू इच्छितो. तिने बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेऊ इच्छितो आणि बहिणींसोबत वेळ घालवू इच्छितो.”
मुंबई उच्च न्यायालयाने शिझानच्या जामिनाचा निर्णय वसई सत्र न्यायालयाकडे सोपवला होता. या खटल्यासाठी तुनिशाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ताची नियुक्ती करण्यात आली होती.
तुनिशाच्या आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन गोष्टी समोर आल्या आहेत. तुनिशाच्या कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी केली जातेय. पोलिसांनी तुनिशाच्या आत्महत्या प्रकरणात लव्ह-जिहादच्या अँगलने तपास करावा, अशी मागणी तिच्य्या काकांनी केली होती. हे 100 टक्के लव्ह-जिहादचं प्रकरण आहे, असा दावा त्यांनी केला होता.
24 डिसेंबर रोजी तुनिशाने ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. याच मालिकेत तुनिशा आणि शिझान एकत्र काम करत होते. तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 25 डिसेंबर रोजी शिझानला अटक झाली होती.
तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी शिझानचा काहीच दोष नाही असं त्याचे वकील शैलेंद्र मिश्रा आणि शरद राय कोर्टात म्हणाले होते. इतकंच नव्हे तर आत्महत्येच्या 15 मिनिटं आधी तुनिशा ही अली नावाच्या व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती, असाही दावा त्यांनी केला होता. या अँगलने तपास करण्याची मागणी त्यांनी न्यायाधीशांसमोर केली होती. त्याचप्रमाणे घटनास्थळी कोणतीच सुसाईड नोट सापडलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.