मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ या चित्रपटाची सुरुवात संमिश्र प्रतिसादाने झाली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने अवघ्या 6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवसाची कमाईसुद्धा तेवढीच झाली. शहजादाने पहिल्या दोन दिवसांत 12 कोटी रुपये कमावले आहेत. वीकेंडचाही चित्रपटाच्या कमाईवर फारसा परिणाम झाला नाही. रोहित धवन दिग्दर्शित हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अला वैंकुठपुरामुलू’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात अल्लू अर्जुनने मुख्य भूमिका साकारली होती. शहजादामध्ये कार्तिकसोबत अभिनेत्री क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत आहे.
कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’ हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता. त्याआधी प्रदर्शित झालेला त्याचा ‘भुल भुलैय्या 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला. या चित्रपटाने 180 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. त्यामुळे कार्तिकच्या ‘शहजादा’ चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या.
शहजादा या चित्रपटाला शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि हॉलिवूड चित्रपट ‘आंट मॅन अँड द वास्कम: क्वांटुमॅनिया’कडून बॉक्स ऑफिसवर टक्कर पहायला मिळतेय. पठाण हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. मात्र अद्याप काही ठिकाणी बॉक्स ऑफिसवर त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे शहजादा हा चित्रपट जेमतेम 20 कोटी रुपये कमावू शकेल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.
#Shehzada falls flat… Fails to register *major* growth/jump on Day 2, despite #MahaShivratri holiday… The journey ahead [weekdays] appears to be unsteady, since the trending over the weekend is lacklustre… Fri 6 cr, Sat 6.65 cr. Total: ₹ 12.65 cr [+/-]. #India biz. pic.twitter.com/971gnwXiDj
— taran adarsh (@taran_adarsh) February 19, 2023
शहजादा हा चित्रपट आधी 10 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र पठाणशी टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पठाणने देशभरात 500 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
विशेष म्हणजे कार्तिक आर्यनने केवळ शहजादामध्ये अभिनयच केला नाही तर त्याने या चित्रपटाची निर्मितीसुद्धा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याने क्रिती सनॉनसोबत मिळून चित्रपटाचं जोरदार प्रमोशनसुद्धा केलं. कॉलेज, मॉल आणि इतर प्रमोशनल कार्यक्रमांद्वारे त्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
शहजादा या चित्रपटात कार्तिक आणि क्रितीसोबतच परेश रावल, मनिषा कोईराला, राजपाल यादव, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर यांच्याही भूमिका आहेत. शहजादाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे प्रेक्षकांनी याआधी मूळ चित्रपट पाहिला आहे. याशिवाय ‘अला वैंकुठपुरामुलू’ या चित्रपटाचा हिंदी डबिंग व्हर्जनुसुद्धा युट्यूबवर मोफत उपलब्ध आहे. त्यामुळेच हिंदी रिमेकचा हा फंडा कार्तिकला काही खास जमला नाही, असंच म्हणावं लागेल.