Shehzada | शाहरुख खानच्या ‘पठाण’ने कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ला केलं चितपट; वीकेंडला कमाईची घसरगुंडी
कार्तिक आर्यनच्याच 'भुल भुलैय्या 2' या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला तब्बल 55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे 'शहजादा'साठी हा खूप मोठा फटका मानला जातोय. विशेष म्हणजे कार्तिकने या चित्रपटाची सहनिर्मितीसुद्धा केली आहे.
मुंबई : कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ला बॉक्स ऑफिसवर काही शाही ट्रिटमेंट मिळताना दिसत नाहीये. कार्तिक आर्यन आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी ‘शहजादा’ने 6.50 कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी या कमाईत किंचित वाढ झाली आणि कमाईचा आकडा 7.30 कोटींवर पोहोचला. त्यामुळे या चित्रपटाची पहिल्या वीकेंडची कमाई ही 19.95 कोटी रुपये इतकीच झाली. कार्तिक आर्यनच्याच ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला तब्बल 55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे ‘शहजादा’साठी हा खूप मोठा फटका मानला जातोय. विशेष म्हणजे कार्तिकने या चित्रपटाची सहनिर्मितीसुद्धा केली आहे.
या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी ‘बाय वन गेट वन’ अशी फ्री ऑफर तिकिटांवर देण्यात आली होती. मात्र तरीही कमाईचा आकडा काही सकारात्मक नव्हता. दुसऱ्या बाजूला जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट अद्याप थिएटरमध्ये चालतोय. त्यामुळे याचाही फटका ‘शहजादा’ला बसला आहे. पठाण सध्या चौथ्या आठवड्यात असून जगभरात त्याची कमाई 1000 कोटींच्या जवळ पोहोचताना दिसतेय.
‘शहजादा’ची कमाई
#Shehzada doesn’t live up to the expectations… The weekend biz is below the mark… The *big* jump / turnaround on Sat and Sun – to improve its prospects – is clearly missing… Fri 6 cr, Sat 6.65 cr, Sun 7.55 cr. Total: ₹ 20.20 cr [+/-]. #India biz. pic.twitter.com/dNwZQP640S
— taran adarsh (@taran_adarsh) February 20, 2023
शहजादा हा अल्लू अर्जून आणि पूजा हेगडे यांच्या ‘अला वैकुंठपुरामुलू’ या तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. बॉक्स ऑफिसवर कार्तिकच्या या चित्रपटाची टक्कर ‘आंट मॅन अँड द वास्प: क्वांटमॅनिया’ या हॉलिवूड चित्रपटाशीही आहे. या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत 17.70 कोटी रुपये कमावले आहेत.
शहजादा या चित्रपटात कार्तिक आणि क्रितीसोबतच परेश रावल, मनिषा कोईराला, राजपाल यादव, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर यांच्याही भूमिका आहेत. शहजादाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे प्रेक्षकांनी याआधी मूळ चित्रपट पाहिला आहे. याशिवाय ‘अला वैंकुठपुरामुलू’ या चित्रपटाचा हिंदी डबिंग व्हर्जनुसुद्धा युट्यूबवर मोफत उपलब्ध आहे. त्यामुळेच हिंदी रिमेकचा हा फंडा कार्तिकला काही खास जमला नाही, असंच म्हणावं लागेल.