Bangladesh Violence : भयानक! बांग्लादेशमध्ये संतापलेल्या जमावाकडून प्रसिद्ध अभिनेत्याची ठेचून हत्या
बांग्लादेशमधील हिंसाचार अधिकाधिक वाढत चालला आहे. तिथली आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. संतापलेल्या जमावाने बांग्लादेशमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सलीम खान आणि त्यांचा मुलगा, अभिनेता शांतो खान यांची ठेचून हत्या केली आहे.
हिंसेच्या आगीत जळणाऱ्या बांग्लादेशमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बांग्लादेशमधील चित्रपट निर्माते सलीम खान आणि त्यांचा मुलगा शांतो खान यांची जमावाने ठेचून हत्या केली. सलीम खान हे निर्मात्यासोबतच बांग्लादेशच्या चांदपूर उपजिल्ह्यातील लक्ष्मीपूर मॉडल युनियन परिषदेचे अध्यक्षसुद्धा होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी 5 ऑगस्ट रोजी सलीम आणि शांतो यांनी त्यांच्या घरातून पळण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाच बलिया युनियनचा संतापलेला जमाव फरक्काबाद बाजारात त्यांच्यासमोर आली. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सलीम यांनी पिस्तुलाने गोळ्यासुद्धा झाडल्या होता. मात्र त्यानंतर जवळच असलेल्या बगरा बाजारातील जमावाशी त्यांचा सामना झाला. तिथेच संतापलेल्या जमावाने सलीम आणि त्यांचा मुलगा, अभिनेता शांतो यांची ठेचून हत्या केली.
भारतीय बंगाली सिनेसृष्टीशीही होतं कनेक्शन
सलीम खान हे भारतातील बंगाली फिल्म इंडस्ट्रीशीही (टॉलिवूड) जोडलेले होते. त्यांनी टॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्यांपैकी एक देव यांच्यासोबत मिळून ‘कमांडो’ हा चित्रपट बनवला होता. पण हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, टॉलिवूडमध्ये सलीम यांचे जवळपास 10 चित्रपट प्रॉडक्शनच्या विविध टप्प्यांवर होती आणि त्यात मोठे टॉलिवूड स्टार्स काम करत होते. टॉलिवूडशी जोडले गेलेले कार्यकारी निर्माते अरिंदम यांनी सोमवारीच सलीम यांच्याशी संपर्क साधला होता. सलीम यांनी बांग्लादेशी चित्रपट ‘तुंगीपरार मिया भाई’चं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाची कथा बांग्लादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबूर रहमान यांच्या आयुष्यावर आधारित होती.
सलीम यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप
सलीम यांच्यावर आरोप होता की ते बऱ्याच वर्षांपासून चांदपूर नेव्ही बाऊंड्रीजवळ पद्मा-मेघना नदीतून अवैध वाळू उपसा प्रकरणात सामील होते. याच अवैध वाळू उपसातून त्यांनी खूप पैसा कमावल्याचं म्हटलं जातं. याप्रकरणी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता आणि त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खटलासुद्धा सुरू आहे.
“आम्हाला त्या दोघांच्या मृत्यूबाबत समजलं आहे. पण त्याबद्दलची अधिक माहिती आम्हाला मिळालेली नाही. सुरक्षेखातर आम्ही त्याठिकाणी जाऊ शकलो नाही”, असं चांदपूर सदर मॉडल पोलीस अधिकाऱ्यांनी सलीम आणि शांतो खान यांच्या मॉब लिंचिंगबद्दल सांगितलं. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशाबाहेर पडल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.