मुलाच्या निधनानंतर पूर्णपणे खचले होते शेखर सुमन; बऱ्याच वर्षांनंतर घडला चमत्कार
अभिनेते शेखर सुमन यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाला गमावलं होतं. दहा वर्षांच्या आयुषचं आजारपणात निधन झालं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मुलाला गमावण्याचं दु:ख व्यक्त केलं. त्याचसोबत घडलेल्या चमत्काराविषयी सांगितलं.
आपल्या पोटच्या मुलाला गमावण्याचं दु:ख काय असतं, ते शब्दांत वर्णन करता येणार नाही. अभिनेते शेखर सुमन यांनासुद्धा हे दु:ख सहन करावं लागलं होतं. त्यांच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलाने आपले प्राण गमावले होते. हृदयाशी संबंधित आजारामुळे आयुषचं निधन झालं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. “मी आतून इतका खचलो होतो की मला यशाशी काही देणंघेणं नव्हतं आणि मला जगायचीही इच्छा नव्हती”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. मुलाच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यावर दु:खाचं डोंगरच कोसळलं होतं.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शेखर सुमन म्हणाले, “माझ्या दहा वर्षांच्या मुलाला जेव्हा मी गमावलं, तेव्हा माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. माझी जगायचीच इच्छा राहिली नव्हती. मी माझ्या हृदयाचा एक भागच गमावला होता, जो माझ्यासाठी खूप प्रिय होता. मी जमिनीवर डोकं आपटून रडत होतो. मुलाच्या निधनानंतर मला कोणत्याच गोष्टीशी घेणं-देणं नव्हतं. चित्रपटात काम करणं, पैसे कमावणं या गोष्टींमध्ये काहीच रस उरला नव्हता. मी जणू निर्जीवच झालो होतो. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मी काम करत होतो, पण माझ्यात जगायची इच्छाच उरली नव्हती.”
View this post on Instagram
शेखर सुमन यांनी याच मुलाखतीत सांगितलं की मुलाच्या निधनानंतर ते अनेक पंडितांना भेटले आणि त्यांना विचारलं की असं का होतंय? अखेर एकेदिवशी एका व्यक्तीने त्यांना सांगितलं की त्यांचा मुलगा नक्कीच भेटणार. 2009 मध्ये शेखर सुमन हे बिहारच्या निवडणूक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांची पत्नी काशी विश्वनाथला गेली होती. रॅलीदरम्यान त्यांच्या पत्नीने त्यांना फोन केला आणि त्यांच्यासोबत घडलेली आश्चर्यकारक घटना सांगितली. अल्का यांनी शेखर सुमन यांना सांगितलं की एका सेकंदासाठी त्यांना आयुषसारख्या दिसणाऱ्या मुलाला पाहिलं होतं. एका निर्मनुष्य जागी त्या कारमध्ये बसल्या होत्या, त्याचवेळी एक मुलगा त्यांच्याकडे आला आणि त्याने अल्का यांच्याकडे पैसे मागितले. जेव्हा त्यांनी पैसे दिले तेव्हा तो मुलगा म्हणाला, “यात माझं काय होईल?” हेच वाक्य त्यांचा मुलगा आयुष आजारी असताना बोलायचा. मुलाच्या तोंडून तेच शब्द ऐकून त्या चकीत झाल्या होत्या.