जणू माझा अंतच..; 11 वर्षीय मुलाच्या निधनाविषयी व्यक्त झाले शेखर सुमन
अभिनेते शेखर सुमन यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या 11 वर्षीय मुलाला गमावलं होतं. आयुषचं निधन हृदयाशी संबंधित आजाराने झालं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मुलाला गमावण्याचं दु:ख व्यक्त केलं.
कोणत्याही पालकांसाठी आपल्या मुलाला गमावण्याच्या दु:खापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही, अशा शब्दांत अभिनेता शेखर सुमनने भावना व्यक्त केल्या. त्याचा मुलगा आयुषने वयाच्या 11 व्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला होता. हृदयाशी संबंधित आजारपणामुळे त्याने प्राण गमावले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेखर त्याच्या आयुष्यातील या कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. शेखर सुमनने त्याच्या करिअरमध्ये रेखा, जुही चावला, डिंपल कपाडिया, पद्मिनी कोल्हापुरे यांसारख्या मोठमोठ्या अभिनेत्रींसोबत काम केलं होतं. मात्र मुलाच्या आजारपणाविषयी कळताच त्याच्या करिअरमधील पडता काळ सुरू झाला होता.
“करिअरमधील त्या पडत्या काळात काहीच काम नीट होत नव्हतं. तिथूनच संघर्षाची सुरुवात झाली होती आणि 1989 मध्ये जेव्हा मला माझ्या मुलाच्या गंभीर आजाराविषयी समजलं, तेव्हा गोष्टी आणखी बिकट झाल्या होत्या. तो माझ्या करिअरचा शेवट होता, तो माझा शेवट होता. माझ्या आयुष्याचा, कुटुंबाचा आणि सगळ्याच गोष्टींचा शेवट होतोय, असं मला वाटलं होतं. माझ्या मुलाजवळ बसून मी सतत हेच विचार करत होतो की एकेदिवशी हा मला एकटा सोडून जाणार”, अशा शब्दांत शेखर सुमन व्यक्त झाला.
View this post on Instagram
याविषयी तो पुढे म्हणाला, “मुलाला गमावण्याच्या खूप वर्षांपासूनच आम्ही रडत होतो. त्याला आठ महिन्यांचा वेळ देण्यात आला होता, पण तो चारच महिने जगला. आमच्या आयुष्यातील तो सर्वांत कठीण काळ होता. मी माझ्या आयुष्यात बरंच काही पाहिलंय पण देवासाठी माझ्या मनात कायम कृतज्ञतेची भावना आहे. त्या काळात ज्या ज्या लोकांनी माझी मदत केली, त्यांचाही मी कायम ऋणी आहे. कितीही काही घडलं तरी आयुष्य पुढे निघून जातं. कोणत्याही आईवडिलांसाठी त्यांच्या मुलाला किंवा मुलीला गमावणं हे जगातलं सर्वांत मोठं दु:ख असतं.”
एका मुलाखतीत मुलाविषयी बोलताना शेखर सुमन म्हणाला, “माझ्या अकरा वर्षांच्या मुलाला जेव्हा मी गमावलं, तेव्हा माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. माझी जगायचीच इच्छा राहिली नव्हती. मी माझ्या हृदयाचा एक भागच गमावला होता, जो माझ्यासाठी खूप प्रिय होता. मी जमिनीवर डोकं आपटून रडत होतो. मुलाच्या निधनानंतर मला कोणत्याच गोष्टीशी घेणं-देणं नव्हतं. चित्रपटात काम करणं, पैसे कमावणं या गोष्टींमध्ये काहीच रस उरला नव्हता. मी जणू निर्जीवच झालो होतो. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मी काम करत होतो, पण माझ्यात जगायची इच्छाच उरली नव्हती.”
शेखर सुमनने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. नेटफ्लिक्स ही सीरिज प्रदर्शित झाली असून यामध्ये त्याचा मुलगा अध्ययन सुमनसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.