मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या कुटुंबीयांसोबत मिळून होलिका दहन केलं आणि त्याचा व्हिडीओ खास चाहत्यांसोबत शेअर केला. शिल्पा प्रत्येक सण धूमधडाक्यात साजरा करताना दिसते आणि त्याचे विविध फोटो, व्हिडीओ ती सोशल मीडियावर अपलोड करते. सोमवारी तिने आई, पती आणि मुलांसोबत होलिका दहन केलं आणि यावेळी ती हात जोडून प्रार्थना करतानाही दिसली. शिल्पा शेट्टीला पाहून तिच्या मुलांनीही होलिकासमोर हात जोडले. मात्र या व्हिडीओतील एका गोष्टीवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
सोमवारी रात्री देशभरातील विविध ठिकाणी होलिका दहन करण्यात आलं होतं. यावेळी शिल्पा शेट्टीनेही तिच्या घराच्या समोर होलिका दहन केलं आणि त्याचा व्हिडीओ पोस्ट केला. होलिका दहन म्हणजेच आपल्या आयुष्यातील नकारात्मकता आणि वाईट गोष्टींचा खात्मा करणे होय. मात्र शिल्पाने केलेल्या होलिका दहनच्या व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना अशी गोष्ट दिसली, ज्यावरून त्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
शास्त्रानुसार, होळी दहनात योग्य लाकडं वापरली नाहीत तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. सहसा फिकस रेसमोसा आणि एरंडेलच्या झाडाच्या लाकडांचा वापर केला जातो. त्यात बांबू, पिंपळ, वड, कडुनिंब, अशोक यांसारख्या झाडांची लाकडं वापरली जात नाहीत. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार ही झाडं पूजनीय आहेत. त्यांचा वापर यज्ञ, विधी या शुभ कामांसाठी होतो. त्यामुळे त्यांची लाकडं होलिका दहनासाठी वापरू नये असं म्हणतात.
शिल्पाने केलेल्या होलिका दहनात बांबूचं लाकूड पहायला मिळालं. त्यावरूनच नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार बांबूचं लाकूड जाळणं अयोग्य आहे, असं एकाने लिहिलं. तर बांबूचं लाकूड जाळलं जात नाही, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.
मुलगी शमिशाला कडेवर उचलून शिल्पा या व्हिडीओमध्ये पूजा करताना दिसतेय. त्यानंतर तिचे कुटुंबीय हात जोडून प्रार्थना करतात आणि अग्निची परिक्रमा करतात. या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टीची दोन्ही मुलं, आई आणि पती राज कुंद्रासुद्धा दिसत आहे. ‘आम्ही छोट्या छोट्या चिठ्ठ्यांमध्ये आमच्या सर्व नकारात्मक भावना आणि विचारांना लिहितो. याच चिठ्ठ्या आम्ही होलिका दहन करताना त्यात वाहतो. ही गोष्ट आम्ही दरवर्षी न चुकता करतो’, असं शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिलं.