99व्या वाढदिवसाचे औचित्य, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे चरित्र ‘बेल भंडारा’ आता ऑडिओबुकमध्ये ऐकता येणार!
बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य डॉ. सागर देशपांडे यांनी शब्दबद्ध केलेलं 'बेल भंडारा' बाबासाहेबांच्या शतकोत्सवी वर्षात रसिकांना 'ऑडिओबुक'मध्ये ऐकायला मिळणं हा दुग्धशर्करा योग म्हणता येईल.
मुंबई : जेष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) हे आज (29 जुलै) वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्ताने ‘स्टोरीटेल मराठी’ने महाराष्ट्राच्या या लाडक्या सुपुत्राचे डॉ. सागर देशपांडे लिखित ‘बेल भंडारा’ हे चरित्र रसिकश्रोत्यांच्या आवडत्या ‘ऑडिओबुक’मध्ये या विशेष दिनाचे औचित्य साधून आणले आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य डॉ. सागर देशपांडे यांनी शब्दबद्ध केलेलं ‘बेल भंडारा’ बाबासाहेबांच्या शतकोत्सवी वर्षात रसिकांना ‘ऑडिओबुक’मध्ये ऐकायला मिळणं हा दुग्धशर्करा योग म्हणता येईल.
‘बाबासाहेब पुरंदरे’ हे नाव आज महाराष्ट्रालाच काय संपूर्ण देशाला सुपरिचित आहे. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्त्व नेमकं ‘घडलं’ कसं हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांच्याच मनात असते. बाबासाहेबांनी स्वतःचं चरित्र लिहावं यासाठी त्यांना अनेकांनी अनेकदा विनवलं, त्यात अनेक दिग्गजांसह अगदी पु.ल.देशपांडेही होते. परंतु, बाबासाहेबांनी फारसं कधी मनावर घेतलं नाही. ते फक्त आणि फक्त शिवमय होऊन राहिलेत.
बाबासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचं दर्शन
मात्र ‘बेल भंडारा’च्या निमित्ताने डॉ. सागर देशपांडे यांच्या 11 वर्षांच्या अथक परिश्रमानं आपल्यासाठी हा ‘बेल भंडारा’ उपलब्ध झाला आहे. या चिरित्रातून बाबासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचं असं काही दर्शन रसिकांना घडतं की, ते स्टोरीटेलवर ऐकताना नकळत आपण बाबासाहेबांसोबतच वावरत असल्याचा भास होत राहतो.
स्टोरीटेलवर ‘बेल भंडारा’ ऐकताना श्रोत्यांच्या मनात असा विचार नक्की येतो की एका व्यक्तीत एवढे गुण कसे काय असू शकतात? एवढी मोठमोठ्ठाली अशक्यप्राय वाटणारी कामं बाबासाहेब कसे काय यशस्वी करून दाखवतात? बाबासाहेब सर्वोत्तम वक्ता आहेत, लेखक आहेत, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या महानाट्याचे निर्माते आहेत व सर्वात मुख्य म्हणजे कुशल संघटक आहे.
ते जे करतात ते सर्वोत्तम दर्जाचे असते. हे सगळं एका व्यक्तीला एकाच जन्मात कसं काय शक्य आहे, या विचारांनी श्रोते ठायीठायी हरवतात. मग वाटतं ‘बाबासाहेब म्हणजे एक अद्भुत चमत्कारच असावेत! अशा या आपल्या बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा जीवनप्रवास मर्यादित शब्दांमध्ये आपल्यासमोर मांडणं म्हणजे एकप्रकारे लेखकासमोर ‘शिवधनुष्य’ पेलण्यासारखंच होतं. ते डॉ. सागर देशपांडेंनी उत्तमरित्या पेललं आहे. आवाजात स्टोरीटेल मराठीवरील ‘बेल भंडारा’ ऑडिओबुकला नचिकेत देवस्थळी या अभिनेत्याचा फ्रेश आवाज लाभला आहे.
(Shivshahir Babasaheb Purandare’s biography ‘Bel Bhandara’ can now be heard in the audiobook)