मुलाच्या दिसण्यावरून सतत ट्रोलिंग; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
'ससुराल सिमर का' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शोएब इब्राहिमने मुलाच्या ट्रोलिंगवर अखेर मौन सोडलं आहे. दीपिकाने गेल्या वर्षी मुलाला जन्म दिला असून त्याचं नाव रुहान असं ठेवलंय. रुहानच्या दिसण्यावरून अनेकदा ट्रोलिंग केली जाते.
‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून अभिनेता शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्करची जोडी हिट ठरली होती. याच मालिकेत एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे डेट केल्यानंतर दीपिका आणि शोएबने निकाह केला. गेल्या वर्षी तिने मुलगा रुहानला जन्म दिला. दीपिका आणि शोएब हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. अनेकदा ते त्यांच्या मुलासोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. मात्र रुहानच्या दिसण्यावरून काही नेटकऱ्यांनी ट्रोलिंगला सुरुवात केली. यावर अखेर शोएबने मौन सोडलं आहे. अशा ट्रोलर्सवर कारवाई का करत नाही, याचंही कारण त्याने सांगितलं आहे.
शोएबने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आस्क मी ए क्वेश्चन’ या सेगमेंटद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची मोकळेपणे उत्तरं दिली. यावेळी त्याने भविष्यातील प्रोजेक्ट्स, ट्रोलिंग आणि इतर बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्या. मुलगा रुहानच्या ट्रोलिंगबद्दलही त्याने उत्तर दिलं. तो म्हणाला, “पब्लिक फिगर (सेलिब्रिटी) असल्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. एकीकडे तुम्हाला संपूर्ण जगातून प्रेम मिळत असतं आणि दुसरीकडे काहीजण ट्रोलसुद्धा करतात. पण त्यांच्या ट्रोलिंगवर काही भाष्य करावं असं मला वाटत नाही, कारण ते त्यासाठीच मोकळे बसलेले असतात. त्यांना आमच्याकडून प्रतिक्रिया हवी असते, उत्तर हवं असतं आणि मला नेमकं तेच करायचं नाही. जी व्यक्ती एका छोट्या मुलाचा तिरस्कार करू शकते, त्याच्याकडून तुम्ही कसली अपेक्षा करणार? लोकांना आमच्याबद्दल जे बोलायचंय ते बोलू द्या. मी त्याकडे लक्ष देत नाही.”
View this post on Instagram
काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दीपिका आणि शोएबने 2018 मध्ये निकाह केला. दीपिकाचं हे दुसरं लग्न आहे. त्याआधी 2011 मध्ये तिने रौनक सॅमसनशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 2015 मध्ये दीपिकाने रौनकला घटस्फोट दिला. रौनकशी विभक्त झाल्यानंतर दीपिकाचं नाव शोएबशी जोडलं गेलं. शोएबशी लग्न केल्यानंतर दीपिकाने इस्लाम धर्म स्वीकारला होता. यासाठी तिने तिचं नाव बदलून फैजा असं ठेवलं होतं. काही दिवसांपूर्वी खुद्द दीपिकाने याची कबुली दिली होती.
शोएबशी लग्नानंतर दीपिकाने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. ती पुन्हा टेलिव्हिजनवर कधी परतणार, असा सवाल अनेकदा चाहत्यांकडून केला जातो. याविषयी उत्तर देताना दीपिका एका मुलाखतीत म्हणाली, “मी सध्या त्या मनस्थितीत नाही की मी बाहेर जाऊन काम करावं, रोज शूटिंगला जावं, तिथल्या कामाशी बांधिल राहावं. कारण अर्थातच जेव्हा तुम्ही एखादी भूमिका स्वीकारता, तेव्हा तुमच्यावर त्या मालिकेची बरीच जबाबदारी असते, त्या कामाप्रती तुम्हाला बांधिल राहावं लागतं. सध्या मी त्या गोष्टीसाठी तयार नाही.”