सानियाशी निकाह का केला? शाहरुख खानच्या प्रश्नावर शोएब मलिकच्या उत्तराने वेधलं लक्ष

| Updated on: Jan 24, 2024 | 8:48 AM

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने दुसऱ्या निकाहचे फोटो पोस्ट करत सर्वांना धक्का दिला. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होत्या.

सानियाशी निकाह का केला? शाहरुख खानच्या प्रश्नावर शोएब मलिकच्या उत्तराने वेधलं लक्ष
शाहरुख खानच्या प्रश्नावर शोएब मलिकच्या उत्तराने वेधलं लक्ष
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 24 जानेवारी 2024 | पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत निकाहचे फोटो पोस्ट करत सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील समस्या हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांना वैतागून सानियाने त्याला ‘खुला’ दिला, असं म्हटलं जात आहे. त्यानंतर त्याने सना जावेदशी निकाह केला. आता सानिया आणि शोएबचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान या दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारताना दिसतोय.

एका टेलिव्हिजन शोनिमित्त शाहरुख खान, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक एकत्र आले होते. यावेळी शाहरुख सानियाला विचारतो, “त्याच्यात तुला असं काय दिसलं, ज्यामुळे तू लगेच लग्न केलंस? दिसायला चांगला आहे, क्रिकेटसुद्धा ठिकठाक खेळतो, सर्वकाही उत्तम आहे. पण अशी खास गोष्ट कोणती आहे?” या प्रश्नाचं उत्तर देताना सानिया म्हणते, “त्याच्यात मी तर बरंच काही पाहिलंय. तो खूप लाजाळू आहे. त्याला थोडं बोलायला तुम्हाला शिकवावं लागेल.”

हे सुद्धा वाचा

सानियाचं उत्तर ऐकल्यानंतर शाहरुख तिला म्हणतो, “ते तर मी करेनच. मी त्याला सांभाळून घेईन. तू काळजी करू नकोस.” यानंतर तो शोएबकडे वळतो. “तुला सानियाबद्दल कोणती गोष्ट आवडली, ज्यामुळे तू तिच्यावर प्रेम करू लागलास”, असा प्रश्न तो शोएबला विचारतो. यावर उत्तर देताना शोएब म्हणतो, “विचार करायचा वेळच नाही मिळाला, त्याच्याआधीच लग्न झालं.”

शोएब आणि सना हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. याविषयी पाकिस्तानी पत्रकार नईम हनिफने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं, “एका टेलिव्हिजन रिॲलिटी शोदरम्यान सना आणि शोएब यांची पहिल्यांदा भेट झाली होती. या शोदरम्यान दोघांची खूप चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर शोएब जेव्हा कधी टीव्हीवर यायचा, तेव्हा तो सनालाही सोबत आणण्याबद्दल आग्रह करायचा.”

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी 2010 मध्ये हैदराबादमध्ये मुस्लीम पद्धतीने निकाह केला होता. त्यानंतर पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये वलिमा पार पडला होता. लग्नाच्या आठ वर्षांनंतर सानियाने मुलाला जन्म दिला. सानिया आणि शोएबचा मुलगा इझान आता पाच वर्षांचा आहे. घटस्फोटाबद्दल सानिया आणि शोएब यांनी मौन बाळगलं होतं.