सलमानच्या घराबाहेर गोळीबारानंतर हल्लेखोर कुठे गेले? कुठून घेतली दुचाकी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानला फोन करून सरकारकडून पूर्ण सहकार्य आणि मुंबई पोलीस विभागाकडून त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना सुरक्षेचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी चर्चा करून सलमानची सुरक्षा वाढवण्याची सूचना केली.
अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे इथल्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी क्षणाक्षणाला आपलं वाहन बदलल्याचं तपासात उघड झालं आहे. घराबाहेरील रस्त्यावर सीसीटीव्हीच्या तपासणीत गोळीबार करणारे दोघे दोन दिवसांपूर्वीही तिथे दिसून आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोळीबारानंतर दोघांनीही वांद्र्यातील माऊंट मेरी परिसरात दुचाकी सोडली. आरोपींनी रायगडमधून ही जुनी दुचाकी खरेदी केली होती. हीच जुनी दुचाकी घेऊन त्यांनी सलमानच्या घरापर्यंत प्रवास केला होता. जुन्या दुचाकीची विक्री करणाऱ्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दुचाकीची नोंदणी ही पनवेलमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाच्या नावावर आहे.
माऊंट मेरी चर्च परिसरात आढळली दुचाकी
दुचाकी चर्चच्या परिसरात सोडल्यानंतर आरोपींनी तिथून रिक्षा पकडली. रिक्षाने ते वांद्रे रेल्वे स्थानकावर आले. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पुन्हा एकदा दोघे कैद झाले. वांद्रे स्थानकातून ट्रेनने हे दोघे सांताक्रूझ स्टेशनला पोहोचले. सांताक्रूझवरून त्यांनी पुन्हा रिक्षा केली आणि वाकोल्याला उतरले. तिथून पुढे हे हल्लेखोर नेमके कुठे गेले हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये. गोळीबारानंतर मुंबईबाहेर पळून जाण्याचा आरोपींचा पूर्वनियोजित प्लॅन होता.
दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार?
या घटनेनंतर संपूर्ण मुंबईत पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. या दोघा संशयितांना पकडण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर अडथळे उभारण्यात आले आहेत. पोलिसांची 15 पथकं या आरोपींचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून प्रथमदर्शनी असं दिसून आलं की हल्लेखोरांनी कोणत्याही व्यक्तीवर नाही तर हवेत गोळीबार केला होता. हा गोळीबार कदाचित फक्त दहशत आणि भीती निर्माण करण्यासाठी केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
फेसबुक पोस्टची तपासणी
गुंड लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल याने फेसबुक पोस्टद्वारे या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. फेसबुकवर नव्याने तयार केलेल्या अकाऊंटवरून पोस्ट लिहित त्याने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. अनमोल हा मे 2022 मध्ये झालेल्या पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणातील वाँटेड आहे. तो कॅनडामध्ये लपून बसल्याचा संशय आहे. ‘हा पहिला आणि शेवटचा इशारा होता. यापुढे भिंतींवर किंवा मोकळ्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत,’ अशी धमकी त्याने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. अनमोलवर 18 फौजदारी खटल्यांमध्ये गुन्हा दाखल असून तो काही काळ जोधपूर तुरुंगात होता. 7 ऑक्टोबर 2021 रोजी त्याची जामिनावर सुटका झाली होती. या फेसबुक पोस्टची चौकशी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.