अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या ‘स्त्री 2’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाचा आनंद घेत आहे. ‘स्त्री 2’ हा या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. यामध्ये श्रद्धाने अभिनेता राजकुमार रावसोबत मुख्य भूमिका साकारली आहे. श्रद्धा तिच्या खासगी आयुष्याविषयी सहसा मोकळेपणे व्यक्त होत नाही. परंतु काही महिन्यांपूर्वी पटकथालेखक राहुल मोदीसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रद्धाने तिचं रिलेशनशिप ‘कन्फर्म’ केलं आहे. ‘कॉस्मोपॉलिटन’ला दिलेल्या या मुलाखतीत श्रद्धाने म्हटलंय की तिला तिच्या पार्टनरसोबत एकत्र वेळ घालवायला खूप आवडतं.
श्रद्धाला रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “मला माझ्या पार्टनरसोबत वेळ घालवायला खूप आवडतं. त्याच्यासोबत चित्रपट बघायला, एकत्र डिनर करायला किंवा फिरायला खूप आवडतं. मी सहसा अशी व्यक्ती आहे जी पार्टनरसोबत एकत्र वेळ घालवण्यास पसंती देते. उदाहरण द्यायचं झाल्यास, जरी मी माझ्या शाळेच्या मित्रमैत्रिणींना बरेच दिवस भेटले नाही तरी त्याचा माझ्या मूडवर परिणाम होतो. कालच आम्ही सर्व कुटुंबीयांनी मिळून एकत्र जेवण केलं. अशा गोष्टींमुळे मनात खूपच सकारात्मक भावना येते. हेच रिलेशनशिपच्या बाबतीत आहे.”
या मुलाखतीत श्रद्धा तिच्या लग्नाच्या प्लॅन्सविषयीही मोकळेपणे व्यक्त झाली. याविषयी ती पुढे म्हणाली, “लग्नसंस्थेवर विश्वास असणं किंवा नसणं ही गोष्ट नाही. तर ज्या व्यक्तीसोबत लग्न करतोय ती व्यक्ती योग्य आहे की नाही हा प्रश्न आहे. माझ्यासाठी योग्य व्यक्तीसोबत असणं फार महत्त्वाचं आहे. योग्य व्यक्तीसोबत राहिल्यावर जर एखाद्याला लग्न करावंसं वाटत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. पण जर का त्यांना लग्न करावंसं वाटत नसेल, तरी ती चांगली गोष्ट आहे.”
राहुल मोदी हा पटकथालेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची श्रद्धा कपूरशी भेट झाली. राहुलने याआधी ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलंय. तो श्रद्धापेक्षा वयाने लहान असल्याचं कळतंय. त्याचं वय 34 वर्षे असून श्रद्धा कपूर ही 37 वर्षांची आहे. राहुलचं दिग्दर्शक सुभाष घई यांच्याशीही कनेक्शन आहे. कारण त्याने घई यांच्याच ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट’मधून पदवी प्राप्त केली.