दिल रख ले लेकिन..; श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची जाहीर कबुली; कोण आहे बॉयफ्रेंड?
अभिनेत्री श्रद्धा कपूरने अखेर तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. मंगळवारी रात्री तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये बॉयफ्रेंडसोबतचा सेल्फी पोस्ट केला. त्यावर लिहिलेल्या कॅप्शनमध्ये तिने प्रेमाची कबुली दिली आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून तिच्याबद्दल नकारात्मक बोलणारे क्वचितच सापडतील. श्रद्धा तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमध्ये जेव्हा ती एका व्यक्तीसोबत पोहोचली, तेव्हापासून तिच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अखेर आता तिने हे रिलेशनशिप ‘इन्स्टाग्रामवर ऑफिशिअल’ केलं असं आपण म्हणू शकतो. कारण नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याच व्यक्तीसोबतचा सेल्फी पोस्ट करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. श्रद्धासोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या या व्यक्तीचं नाव राहुल मोदी असं आहे.
‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटासाठी काम करताना श्रद्धा आणि राहुलची भेट झाली. तेव्हापासूनच हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. मंगळवारी रात्री उशिरा श्रद्धाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये राहुल मोदीसोबतचा सेल्फी पोस्ट केला. त्यावर तिने लिहिलं, ‘दिल रख ले, नींद तो वापस दे दे यार’ (माझं हृदय तुझ्याकडे ठेव, पण झोप तरी परत दे). या कॅप्शनच्या पुढे तिने स्माइली आणि हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे.
जामनगरमध्ये अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात सर्वांत आधी या दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं. गेल्या वर्षी मुंबईत डिनर डेटला गेल्यावरही त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर या वर्षी मार्च महिन्यात एका कार्यक्रमात श्रद्धाच्या गळ्यात ‘R’ या अक्षराचं पेंडंट पहायला मिळालं होतं. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना आणखी उधाण आलं होतं. राहुलने ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाची कथा लिहिली होती. तर श्रद्धा आणि रणबीर कपूरने त्यात मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
श्रद्धाची पोस्ट
कोण आहे राहुल मोदी?
राहुलने ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाशिवाय ‘प्यार का पंचनामा 2’ आणि ‘सोनू के टिटू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटांसाठीही पटकथालेखक म्हणून काम केलंय. राहुलच्या आधी श्रद्धाचं नाव सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाशी जोडलं गेलं होतं. जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2022 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.
श्रद्धाच्या करिअरविषयी बोलायचं झाल्यास, ती लवकरच ‘स्त्री 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.