दिल्ली- दिल्लीतील श्रद्धा मर्डर केसमुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. 27 वर्षांच्या श्रद्धा वॉकरची तिच्या प्रियकरानेच निर्घृण हत्या केली. आरोपी आफताब पूनावाला याने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करत ते जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. दिल्ली पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. या तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्याप्रकारे आफताबने त्याच्या प्रेयसीची हत्या केली आणि तिच्या शरीराचे तुकडे जंगलात फेकले, हे ऐकून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, आफताबने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की त्याने वेब सीरिज पाहून श्रद्धाच्या हत्येची प्लॅनिंग केली. प्रसिद्ध अमेरिकन क्राइम सीरिज ‘डेक्स्टर’चं (Dexter) त्याने नाव घेतलं. डेक्स्टर मॉर्गनवर (मायकल सी. हॉल) आधारित ही सीरिज मियामी मेट्रो पोलीस विभागाची एक काल्पनिक कथा आहे. हत्येच्या पॅटर्नचं विश्लेषण करणाऱ्या या सीरिजमध्ये सीरिअल किलरचं आयुष्य दाखवलं आहे.
डेक्स्टर या वेब सीरिजमधील मुख्य नायक डेक्स्टर मॉर्गन हा मियामी मेट्रो पोलीस विभागात फॉरेन्सिक टेक्निशियन म्हणून काम करत असतो. दिवसा तो गुन्ह्यांचा तपास करायचा, मात्र रात्री सीरिअल किलर बनून तो लोकांची हत्या करायचा. न्यायव्यवस्था गुन्हेगारांना पुरेशी शिक्षा देत नाही, म्हणून तो स्वत:च गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा देतो.
या सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये डेक्स्टर हा हत्येनंतर शरीराचे तुकडे करून ते कचऱ्याच्या पिशवीत भरायचा. त्या पिशव्यांचं वजन वाढवण्यासाठी तो त्यात दगडी भरून सील करायचा. नंतर याच पिशव्या तो समुद्रात फेकायचा.
आफताबने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की त्याला फक्त श्रद्धाचं तोंड बंद करायचं होतं. मात्र मारहाणीत त्याने तिचा गळाच दाबला. श्रद्धाच्या मृतदेहाला ठेवण्यासाठी त्याने नवीन फ्रीजसुद्धा खरेदी केला होता. तिच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तो पुढील दोन-तीन महिने मेहरौलीच्या जंगलात फिरत होता.