मुंबई : 14 फेब्रुवारी 2024 | गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर पुन्हा जीवनदान मिळालं होतं. त्याच्यावर तातडीने अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. या संपूर्ण काळात श्रेयसची पत्नी आणि जवळच्या व्यक्तींनी त्याची खूप साथ दिली. आता आजारपणानंतर श्रेयस मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी मंचावर श्रेयस सर्वांसमोर भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची पत्नी दिप्ती तळपदेचेही डोळे पाणावले होते.
आजारपणानंतर कमबॅक करताना श्रेयस म्हणाला, “माझ्याकडे आता बोलायला काही शब्दच नाहीत. माझ्यासोबत जे झालं त्याची उजळणी खरंच नको, पण असं कोणत्याही वैऱ्यासोबतही घडू नये. या काळात मला लोकांचा आशीर्वाद, प्रेम आणि प्रार्थना लाभल्या. अनेकांनी खूप प्रेमाने माझ्यासाठी सर्वकाही केलं. या जन्मात मी त्यांचे ऋण फेडू शकणार नाही. माझ्यासाठी हा माझा नवीन जन्मच आहे. माझी आणि माझ्या पत्नीची मदत केलेल्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो.” यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेली श्रेयसची पत्नी त्याला पाहून भावूक झाली होती.
काही दिवसांपूर्वी श्रेयसने एका वेबसाइटला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तो म्हणाला होता, “क्लिनिकली, मी मृतावस्थेत होतो. कारण तेवढ्या तीव्रतेचा तो कार्डिॲक अरेस्ट होता. हा माझ्यासाठी वेक-अप कॉल होता असंच मी म्हणेन. आयुष्याने मला ही दुसरी संधी दिली आहे. माझं आयुष्य वाचविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांचा मी किती ऋणी आहे हे मी शब्दांत मांडू शकत नाही. अर्थात माझी सुपरवुमन पत्नीसुद्धा, तिने मला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न केले होते.”
गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी श्रेयस तळपदेला हार्ट अटॅकमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. जवळपास सहा-सात दिवसांनंतर श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. “मी माझ्या आयुष्यात याआधी कधीच रुग्णालयात दाखल झालो नव्हतो. कधीच कोणतं फ्रॅक्चरसुद्धा झालं नव्हतं. त्यामुळे असं काही होईल याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती. तुमच्या आरोग्याला अजिबात गृहित धरू नका. जान है तो जहान है”, असं त्याने म्हटलं होतं.