मुंबई : दिग्गज अभिनेते कमल हासन यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हासन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मात्र अनेकदा तिला विविध कारणांमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. श्रुतीने ट्रोलिंगला न जुमानता काही वेळा सडेतोड उत्तर देऊन टीकाकारांचं तोंड बंद केलं आहे. आता पुन्हा एकदा ती अशाच एका उत्तरामुळे चर्चेत आली आहे. नुकताच श्रुतीने प्रश्नोत्तराच्या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली. मात्र या सेशनदरम्यान एका चाहत्याने तिला ड्रग्जबद्दल प्रश्न विचारला. ‘तू ड्रग्ज घेतेस का’, असा प्रश्न विचारणाऱ्याला श्रुतीने जे उत्तर दिलं, त्याचीच सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. संबंधित ट्रोलरने तिला असंही विचारलं की, “तू पॉट स्मोक करतेस ना?”
ड्रग्ज आणि पॉट स्मोकबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला श्रुतीने उत्तर दिलं, ‘नाही, मी पॉट स्मोक करत नाही. मी दारुसुद्धा पीत नाही. मी संयमित आयुष्य जगते आणि त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे.’ श्रुतीच्या या उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. तिने ट्रोलर्सची बोलती बंद केल्याचं कौतुक चाहते करत आहेत. मात्र 2019 मध्ये श्रुतीने खुलासा केला होता की तिला दारुचं व्यसन होतं. त्यामुळे तिला आरोग्याच्या काही समस्यांनाही सामोरं जावं लागलं होतं. हळूहळू श्रुतीने दारुचं व्यसन सोडण्यास उपचार सुरू केले.
मध्यंतरीच्या काळात श्रुती हासनच्या मानसिक आरोग्याविषयीही चर्चा होत्या. मानसिक आरोग्यावरील उपचारांमुळे तिने एका चित्रपटाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नसल्याचं चर्चा होती. त्यावर श्रुतीने ट्रोलर्सना फटकारलं होतं. ‘अशा पद्धतीची चुकीची माहिती पसरवणे, अशा विषयांना अत्यंत नाट्यमय पद्धतीने हाताळणे यांमुळेच लोक मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणे बोलण्यास घाबरतात. पण या सर्वांचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. मी नेहमीच मानसिक आरोग्याविषयी बेधडकपणे बोलत राहीन. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वत:ची काळजी घेण्याला मी प्राधान्य देत राहीन. मला फक्त ताप होता, पण तुम्ही थेरेपीस्टकडे जाऊन उपचार घेण्याची गरज आहे’, असं तिने सुनावलं होतं.
श्रुती सध्या तिच्या आगामी ‘सालार’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये ती ‘बाहुबली’ स्टार प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तर प्रशांत नीलने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी प्रशांत नीलने केजीएफ आणि केजीएफ 2 यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.