‘श्वास’ फेम दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नवा चित्रपट; ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
'आयुष्यात दुःख भोगण्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीला दुःखात, त्रासात बघणं हे अधिक दुःखदायक असतं. अशावेळी आपलं जीवन अधिक सुंदर करण्याचं सामर्थ्य आत्मसात करणं गरजेचं असतं, हेच या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक संदीप सावंत सांगतात.
कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे. स्वत:ला पडलेले प्रश्न, आजबाजूच्या समस्या दिग्दर्शक संदीप सावंत यांनी आपल्या सिनेमांतून आजवर अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत. ‘श्वास, ‘नदी वाहते’ यांसारख्या चित्रपटांमधून चित्रभाषेची प्रगल्भ समज दिग्दर्शक संदीप सावंत यांनी याआधीच दाखवून दिली आहे. मराठी चित्रपट फक्त मनोरंजनातच न अडकता, जगण्यासाठीची प्रेरणा देण्याचे कामही तेवढ्याच ताकदीने आजवर करत आला आहे. एक-दोन नव्हे तर अशा अनेक चित्रपटांची समृद्ध मालिकाच मराठी सिनेसृष्टीने गुंफली आहे. याच मालिकेत दिग्दर्शक संदीप सावंत ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून एक सुंदर पुष्प ओवण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या 8 नोव्हेंबरला ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या ‘मृत्यूस्पर्श’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचं बाळकडू कोणालाच मिळालेलं नसतं, पण कठीण परिस्थितीत माणूस असीम जिद्दीचे तोरण बांधून त्या संकटांवर मात करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, ज्यामध्ये माणसाच्या धैर्याची, चिकाटीची परीक्षा होते. ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातूनही नैराश्याच्या गर्तेत सापडलेला नायक मुकुंद आपल्या कुटुंबाच्या मदतीने जगण्याला कसा आत्मविश्वासाने सामोरा जातो याची प्रेरणादायी कथा पहायला मिळणार आहे. जयदीप कोडोलीकर, प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे, अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.
पॅनोरमा स्टुडिओज सादरकर्ते असलेल्या ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, डॉ. अंजली सतीशकुमार पाटील निर्माते आहेत. मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते रजत गोस्वामी आहेत. ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाची पटकथा-संवाद -दिग्दर्शन संदीप सावंत यांचे आहे. छायाचित्रण प्रियशंकर घोष तर संकलन दिनेश पुजारी यांनी केले आहे. साऊंड डिझाइन सुहास किशोर राणे यांचे आहे. पार्श्वसंगीत विवेक पाटील, आकाश जाधव यांचे आहे. वेशभूषा कुलदीप चव्हाण, सेजल पाटील, राजश्री चारी यांची आहे. रि-रेकॉर्डिंग मिक्सर अनुप देव CAS यांचे आहे. व्यावसायिक सल्लागार देवयानी गांधी आहेत. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे. संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.