मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : प्रसिद्धी टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीचा पूर्व पती अभिनव कोहलीने त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मुलाला भेटू देत नसल्याने अभिनवने श्वेताविरोधात कोर्टात अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने श्वेताला जेव्हा तिच्या मुलाबद्दल विचारलं, तेव्हा तिचे डोळे पाणावले. मुलगा रेयांश आणि अभिनव यांच्या दोन भेटींबद्दल तिने कोर्टात सांगितलं. कोर्टाने आता याप्रकरणी श्वेताला प्रतिज्ञापत्र आणि अभिनव कोहलीला चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
श्वेता तिवारीविरोधातील अभिनव कोहलीच्या अवमान याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. या याचिकेत अभिनवने असा दावा केला की गेल्या आठ महिन्यांपासून तो त्याच्या मुलाला भेटू शकला नाही किंवा त्याच्याशी बोलू शकला नाही. मुलाला भेटू न दिल्याने त्याने या वर्षी मे महिन्यात श्वेताविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्याने म्हटलंय की, न्यायालयाने सप्टेंबर 2021 मध्ये दिलेल्या आदेशात त्याला त्याच्या मुलाला भेटण्याची आणि त्याच्याशी फोनवर बोलण्याची परवागनी दिली होती. याबद्दल खंडपीठाने जेव्हा श्वेताला विचारलं, तेव्हा तिने मुलाला त्याच्या वडिलांशी दोन वेळा भेटायला दिलं होतं, असं सांगितलं.
श्वेता तिवारीने 2013 मध्ये अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं होतं. या दोघांना रेयांश हा मुलगा आहे. मात्र लग्नाच्या काही वर्षांतच दोघांमध्ये वादविवाद सुरू झाले होते. अखेर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्याआधी 1998 मध्ये श्वेताने अभिनेता राजा चौधरीशी लग्न केलं होतं. 2011 मध्ये श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोट घेतला होता. पलक तिवारी ही श्वेता आणि राजा यांचीच मुलगी आहे. पलकने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पलक सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत तिचं नाव जोडलं जातं.