“माझ्या लग्नाचे भोग तुम्ही भोगताय का?”; तिसऱ्यांदा लग्न न करण्याचा सल्ला देणाऱ्यांना श्वेता तिवारीचं सडेतोड उत्तर
"इन्स्टाग्रामवर मला लोक म्हणतात की मी दोन वेळा लग्न केलंय आणि माझी मुलगी पाच वेळा लग्न करणार. पण कदाचित ती लग्नच करणार नाही. माझ्यासोबत जे काही घडलंय, ते तिने पाहिलंय. त्यामुळे ती खूप विचारपूर्वक पाऊल उचलणार", असं श्वेता पुढे म्हणाली.
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारून अभिनेत्री श्वेता तिवारी घराघरात पोहोचली. आपल्या दमदार अभिनयकौशल्यामुळे श्वेताने टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावलं. मात्र खासगी आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेता तिच्या दोन्ही अयशस्वी लग्नांबद्दल आणि कौटुंबिक हिंसाचाराबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. श्वेताने भोजपुरी अभिनेता राजा चौधरीशी पहिलं लग्न केलं होतं. या दोघांनी 2007 मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिने अभिनव कोहलीशी लग्नगाठ बांधली. मात्र हे नातंसुद्धा फार काळ टिकू शकलं नाही. 2019 मध्ये अभिनव आणि श्वेता विभक्त झाले. श्वेताला पहिल्या लग्नापासून पलक तिवारी ही मुलगी आहे. तर अभिनवपासून तिला रेयांश हा मुलगा आहे.
42 वर्षीय श्वेताने ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या अयशस्वी लग्नांबद्दल सांगितलं. जे लोक तिला पुन्हा लग्न न करण्याचा सल्ला देत आहेत त्यांनासुद्धा तिने सडेतोड उत्तर दिलं. “तुम्ही 10 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहा आणि सोडा. तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. पण तुम्ही जर दोन वर्षांनंतर घटस्फोट घेतला तर प्रत्येक जण तुमच्यावर निशाणा साधतो. मला म्हणतात, तू तिसऱ्यांदा लग्न करू नकोस. मी तुम्हाला हा प्रश्न विचारलाय का? तुम्ही कोण आहात मला बोलणारे? माझ्या लग्नाचे भोग तुम्ही भोगताय का? हा माझा वैयक्तिक निर्णय होता, हे माझं आयुष्य आहे”, अशा शब्दांत तिने टीकाकारांना उत्तर दिलं.
याच मुलाखतीत श्वेताने सांगितलं की कशा पद्धतीने तिच्या अयशस्वी लग्नांनंतर इन्स्टाग्रामवर लोक तिच्यावर टीका करतात. तिने दोनदा लग्न केलं म्हणून तिची मुलगी पाच वेळा लग्न करेल, असं ट्रोलर्स म्हणतात. अशांनाही बेधडक उत्तर देत श्वेताने ट्रोलर्सचं तोंड बंद केलं आहे. कदाचित माझी मुलगी कधी लग्नच करणार नाही, कारण तिने तिच्या आईसोबत जे काही घडलं ते पाहिलंय, त्यामुळे फार विचारपूर्वक ती निवड करू शकते, असं ती म्हणाली.
View this post on Instagram
“इन्स्टाग्रामवर मला लोक म्हणतात की मी दोन वेळा लग्न केलंय आणि माझी मुलगी पाच वेळा लग्न करणार. पण कदाचित ती लग्नच करणार नाही. माझ्यासोबत जे काही घडलंय, ते तिने पाहिलंय. त्यामुळे ती खूप विचारपूर्वक पाऊल उचलणार”, असं श्वेता पुढे म्हणाली.
कौटुंबिक हिंसाचाराबद्दल श्वेता म्हणाली, “मध्यमवर्गीय कुटुंबात लहानपणापासूनच तुम्हाला तडजोड करायला म्हटलं जातं. कानाखाली एकदा किंवा दोनदा मारल्याने काहीच फरक पडत नाही असं म्हटलं जातं. पण माझ्या आईने मला कधीच असं म्हटलं नाही. जर मी घटस्फोट घेतला तर मुलांचं काय होईल, असा प्रश्न त्यांना पडायचा. पण जेव्हा मी वयाच्या 27 व्या वर्षी पतीपासून पहिल्यांदा विभक्त झाले तेव्हा मला समजलं की काय वाईट होऊ शकेल? तुमच्या पालकांना दररोज भांडण करताना पाहणं, वडिलांना दारू पिऊन घरी येताना पाहणं हे त्यातून कितीतरी वाईट आहे.”