सिद्धार्थ जाधवच्या अलिबागच्या बंगल्यात राहण्याची संधी; पत्नीचा नवा व्यवसाय
सिद्धार्थ जाधवनेही पत्नीला तिच्या बिझनेसबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. 'अभिनंदन तृप्ती.. आज तुझं स्वप्न पूर्ण झालंय. यासाठी मी खूप आनंदी आहे. देवाचा आशीर्वाद तुझ्यावर असो', असं त्याने लिहिलंय.
अभिनेता सिद्धार्थ जाधवने मराठी कलाविश्वासोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाची विशेष छाप सोडली. आज तो मराठी इंडस्ट्रीतील यशस्वी कलाकारांपैकी एक असला तरी त्याचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. हलाखीच्या परिस्थितीत अत्यंत कठोर मेहनत करत त्याने अभिनयक्षेत्रात नाव कमावलंय. त्याच्या या यशात पत्नी तृप्तीचाही मोलाचा वाटा आहे. सिद्धार्थच्या प्रत्येक पावलावर तिने खंबीर साथ दिली. आता तृप्तीने स्वत:चा नवा व्यवसाय सुरू केला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तृप्तीचा हा व्यवसाय होम स्टेचा आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने तिच्या सुंदर बंगल्याची झलक दाखवली आहे. अलिबागच्या नागाव बीचजवळ हा बंगला आहे. स्विमिंग पूल असलेल्या या तीन बीएचके बंगल्यात राहायची संधी आता पर्यटकांना मिळणार आहे.
कुटुंबीयांसोबत किंवा मित्रमैत्रीणींसोबत एक-दोन दिवसांचा फिरण्याचा प्लॅन करायचा असेल तर, अलिबाग हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय आहे. वीकेंडला असंख्य जण अलिबागमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येतात. अशाच पर्यटकांना राहण्याची उत्तम सुविधा तृप्तीने तिच्या या होम स्टेमार्फत करून दिली आहे. यात तीन एसी आणि नॉन एसी खोल्या असून लिव्हिंग रुम आणि ओपन किचनचीही सुविधा आहे. तृप्तीने अत्यंत विचारपूर्वक हा बंगला सजवला आहे. पर्यटकांना अलिबागचा पुरेपूर आनंद घ्यावा, या हिशोबाने तिने बंगल्याची सजावट केली आहे. हा बंगला आतून कसा दिसतो, याचीही झलक तृप्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दाखवली आहे. या व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील अनेक कलाकार विविध व्यवसायांमध्ये गुंतवणूक करत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी, रुपाली भोसले, अपूर्वा नेमळेकर यांसारख्या कलाकारांचा दागिन्यांचा व्यवसाय आहे. तर कर्जतमध्ये प्राजक्तानेही फार्महाऊस विकत घेतलं असून तिथेही पर्यटकांना राहण्याची संधी आहे. अभिनेत्री प्रिया बापट आणि तिच्या बहिणीचा साड्यांचा बिझनेस आहे. निवेदिता सराफ यांचाही स्वत:चा साड्यांचा व्यवसाय आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचाही साड्यांचा व्यवसाय आहे. अभिनयक्षेत्रासोबतच कलाकारांनी इतरही व्यवसायांमध्ये रस दाखवला आहे.