सिद्धार्थचा चित्रपट पाहण्यासाठी व्हीलचेअरवर आले वडील; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले ‘आदर्श मुलगा’
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' या चित्रपटाचं प्रीमिअर गुरुवारी आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी त्याचे वडील सुनील मल्होत्रा व्हीलचेअरवर प्रीमिअरला पोहोचले. वडिलांचा काळजी घेतानाचा सिद्धार्थचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : 15 मार्च 2024 | अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका असलेला ‘योद्धा’ हा चित्रपट आज (15 मार्च, 2024) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या एक दिवस आधी गुरुवारी ‘योद्धा’च्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सिद्धार्थ त्याच्या कुटुंबीयांसोबत प्रीमिअरला पोहोचला होता. सिद्धार्थने पत्नी कियारा अडवाणी आणि आईवडिलांसोबत फोटोसाठी पोझ दिले. या प्रीमिअरमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ हा व्हीलचेअरवर बसलेल्या त्याच्या वडिलांची काळजी घेताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून चाहते सिद्धार्थचं भरभरून कौतुक करत आहेत. त्याला ‘आदर्श मुलगा’ असं नेटकरी म्हणतायत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ त्याच्या वडिलांच्या दिशेने चालताना दिसून येत आहे. सिद्धार्थचे वडील व्हीलचेअरवर असल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी सतत सोबत एक केअरटेकर असतो. मात्र प्रीमिअरदरम्यान जेव्हा त्यांना गरज भासली, तेव्हा त्यांचा मुलगा सिद्धार्थ त्यांच्या मदतीला धावून आला. त्याने वडिलांचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांची विचारपूस केली. सिद्धार्थचे वडील त्याच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करत असतात. या व्हिडीओवर नेटकरी प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
‘प्रेमळ मुलगा’, असं एकाने लिहिलं. तर ‘देव असा मुलगा प्रत्येकाला देवो’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘देव या दोघांना नेहमी खुश ठेवो’ असा आशीर्वादही काही नेटकऱ्यांनी दिला आहे. या प्रीमिअरला सिद्धार्थसोबतच अभिनेत्री दिशा पटानी, राशी खन्ना, मौनी रॉयसुद्धा उपस्थित होते. हा एक अॅक्शन चित्रपट असून सिद्धार्थ यामध्ये कमांडोच्या भूमिकेत आहे. दहशतवाद्यांपासून तो देशाचं रक्षण कसं करतो, याबद्दलची कथा चित्रपटात पहायला मिळेल. पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. ‘शेरशाह’ या सिद्धार्थच्या गाजलेल्या चित्रपटाच्या निर्मात्यांनीच ‘योद्धा’चीही निर्मिती केली आहे. सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा हे मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते.