मुंबई : पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. सिद्धूच्या मृत्यूनंतरसुद्धा त्याच्या युट्यूब चॅनल आणि गाण्यांमधून कोट्यवधी रुपयांची कमाई सुरू आहे. त्याच्या मृत्यूनंतर काही गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. या गाण्यांना आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय युट्यूब रॉयल्टी आणि बऱ्याच डील्सच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई होत आहे. गेल्या वर्षी पंजाबमधील मनसा जिल्ह्यात सिद्धू मूसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अवघ्या 29 व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनानंतर सर्व संपत्ती आई-वडिलांकडे सोपवण्यात आली.
युट्यूबच्या पॉलिसीनुसार कोणत्याही कलाकाराला त्याच्या व्हिडीओवरील व्ह्यूजच्या आधारावर पैसे दिले जातात. युट्यूबवर जर एखाद्या व्हिडीओला दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले तर जवळपास एक हजार डॉलर मिळतात. आता काही दिवसांपूर्वीच सिद्धूचा ‘मेरे ना’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. अवघ्या दोन दिवसांत या गाण्याला 18 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यातून जवळपास 14.3 लाख रुपयांची कमाई झाली.
सिद्धूच्या दुसऱ्या गाण्यांविषयी बोलायचं झाल्यास मृत्यूनंतर फक्त रॉयल्टीच्या माध्यमातून 50 लाख रुपयांपेक्षा अधिक कमाई झाली आहे. याशिवाय जाहिरातींचे डील्स, स्पॉटीफाय रॉयल्टी, विंक आणि दुसऱ्या म्युझिक प्लॅटफॉर्म्सवरूनही सिद्धू मूसेवालाची बरीच कमाई होते. सिद्धूच्या मृत्यूनंतर त्याच्या बऱ्याच गाण्यांनी जवळपास दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. सिद्धू मूसेवालाच्या मृत्यानमतर त्याची एकूण संपत्ती जवळपास 14 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 114 कोटी रुपये इतकी होती. यामध्ये महागडे कार, पंजाबमधील त्याची प्रॉपर्टी, अनेक ब्रँड डील्स आणि युट्यूब रॉयल्टीमधून मिळालेल्या कमाईचा समावेश होता.
सिद्धू मूसेवाला त्याच्या लाइव्ह शोज आणि कॉन्सर्टमधून जवळपास 20 लाख रुपयांची कमाई करायचा. पब्लिक इव्हेंट्ससाठी तो दोन लाख रुपयांपेक्षा अधिक मानधन घ्यायचा. इतक्या कमी वयात इतकी कमाई करणारा सिद्धू मूसेवालाच्या निधनानंतरही कमाई सुरू आहे. आता त्याच्या रॉयल्टीची रक्कम त्याच्या कुटुंबीयांना मिळत आहे.
राज्य सरकारने सिद्धू मूसेवालाची सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात 27 वर्षीय मूसेवालाचा मृत्यू झाला. सिद्धू त्याच्या जीपमधून जात असताना अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला.
सिद्धूने 2017 मध्ये संगीतविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर त्याचे अनेक म्युझिक अल्बम गाजले. ‘लेजंड’, ‘सो हाय’, ‘द लास्ट राइड’ यांसारख्या त्याच्या गाण्यांना चाहत्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला. सिद्धूच्या मृत्यूनंतर आणखी एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. ‘एसवायएल’ या गाण्याने अनेक विक्रम मोडले होते. तो राजकारणातही सक्रिय होता. सिद्धूने मानसा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ‘आप’चे डॉ. विजय सिंगचा त्याने पराभव केला होता. पंजाब विधानसभा निवडणुकांपूर्वी मूसेवालाने गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.