Sidhu Moose Wala | सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणात मोठं यश; आरोपी सचिन बिश्नोईला आणलं भारतात
दिल्लीतील संगम विहार इथले रहिवाशी तिलक राज तुटेजा यांच्या नावाने हा बनावट पासपोर्ट जारी करण्यात आला होता. त्याच्या आधारे सचिन दुबईला पळून गेला. नंतर त्याने अझरबैजानची राजधानी असलेल्या बाकू या ठिकाणी पोहोचण्यासाठी विमानप्रवास केला.
नवी दिल्ली | 1 ऑगस्ट 2023 : दिवंगत पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी सचिन बिश्नोईला मंगळवारी अझरबैजानमधून भारतात आणण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलचं पथक बिश्नोईच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ट्रान्सकॉकेशियन देशात गेलं होतं. त्याच्या दोन दिवसांतच ही कारवाई करण्यात आली आहे. तिहार तुरुंगात असलेला गँगस्टार लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ सचिन बिश्नोई हा गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणातील मास्टरमाईंडपैकी एक आहे. सचिनने फेसबुकवर मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ताब्यात घेतल्यानंतर तो भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी अझरबैजानमध्ये कायदेशीर लढाई लढत होता. सचिन बिश्नोई हा मूळचा पंजाबमधील फाजिल्का इथला आहे.
याआधी विक्रम ब्रारचं प्रत्यार्पण
राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) या महिन्याच्या सुरुवातीला संयुक्त अरब अमिरातीतून (UAE) गँगस्टर विक्रमजीत सिंग ऊर्फ विक्रम ब्रार याचं यशस्वीरित्या प्रत्यार्पण केलं. त्यानंतर मूसेवालाच्या हत्येप्रकरणात झालेली ही मोठी कारवाई आहे. विक्रम ब्रार हा लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. बिश्नोई गँगशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये तो आरोपी आहे. त्यात सिद्धू मूसेवालाच्या हत्येचाही समावेश आहे.
बनावट पासपोर्टद्वारे भारतातून काढला होता पळ
सेन्ट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूसेवालाच्या हत्येच्या काही काळ आधीच बनावट पासपोर्टच्या आधारे सचिनने दुबईमार्गे भारत सोडलं होतं. दिल्लीतील संगम विहार इथले रहिवाशी तिलक राज तुटेजा यांच्या नावाने हा बनावट पासपोर्ट जारी करण्यात आला होता. त्याच्या आधारे सचिन दुबईला पळून गेला. नंतर त्याने अझरबैजानची राजधानी असलेल्या बाकू या ठिकाणी पोहोचण्यासाठी विमानप्रवास केला. त्याच वेळी त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं.
भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी सचिन बिश्नोईची अझरबैजानमध्ये कायदेशीर लढाई
अझरबैजानमध्ये ताब्यात घेतल्यानंतर भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी सचिनने तिथल्या उच्च प्राधिकरणासमोर अर्ज केलं होतं. जुलै महिन्याच्या सुरुवातीला सचिनचा हा अर्ज फेटाळण्यात आला, तेव्हा सेन्ट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडून केंद्रीय गृह मंत्रालयाकडे त्याबद्दलची माहिती देण्यात आली. तेव्हा गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांचं एक पथक त्याला भारतात आणण्यासाठी पाठवलं.
दिल्लीच्या मोहन गार्डन परिसरातील खंडणीच्या प्रकरणात आणि पंजाबमधील अशाच दोन गुन्ह्यांमध्ये सचिनचा समावेश होता. या तिन्ही प्रकरणांमध्ये त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. सचिन बिश्नोईला भारतात आणल्यामुळे त्याच्या चौकशीदरम्यान मूसेवालाच्या हत्येविषयी नवीन बाबी समोर येण्याची शक्यता आहे.